रूथ 2:1-7
रूथ 2:1-7 MRCV
नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज असे होते. आणि मोआबी रूथ नाओमीला म्हणाली, “ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशा मनुष्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्यामागे राहिलेले धान्य वेचण्यासाठी मला जाऊ दे.” नाओमी म्हणाली, “ठीक आहे, माझ्या मुली, तू जा.” तेव्हा ती गेली, तिने एका शेतात प्रवेश केला आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे राहिलेले धान्य जमा करू लागली, संयोगाने ते शेत बवाजच्या मालकीचे होते, जो एलीमेलेखच्या कुळातील होता. त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!” बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?” त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे. ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.”

