रूथ 2:1-12
रूथ 2:1-12 MRCV
नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज असे होते. आणि मोआबी रूथ नाओमीला म्हणाली, “ज्याची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशा मनुष्याच्या शेतामध्ये जाऊन त्याच्यामागे राहिलेले धान्य वेचण्यासाठी मला जाऊ दे.” नाओमी म्हणाली, “ठीक आहे, माझ्या मुली, तू जा.” तेव्हा ती गेली, तिने एका शेतात प्रवेश केला आणि कापणी करणाऱ्यांच्या मागे राहिलेले धान्य जमा करू लागली, संयोगाने ते शेत बवाजच्या मालकीचे होते, जो एलीमेलेखच्या कुळातील होता. त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!” बवाजाने त्याच्या कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास विचारले, “ती तरुण स्त्री कोणाची आहे?” त्या मुकादमाने उत्तर दिले, “ती मोआबी आहे, ती मोआब देशातून नाओमी बरोबर आली आहे. ती मला म्हणाली, ‘कृपा करून कापणी करणार्यांच्यामागे पेंढ्यांमधून राहिलेले धान्य जमा करून गोळा करू द्या.’ ती सकाळीच शेतामध्ये आली आणि थोडाच वेळ छताखाली विश्रांती घेऊन आतापर्यंत येथेच आहे.” तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “माझ्या मुली, माझे ऐक. धान्य वेचण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊ नकोस आणि येथून दूर जाऊ नकोस. माझ्यासाठी काम करणार्या स्त्रियांबरोबर इथेच राहा. ज्या शेतात माणसे कापणीचे काम करीत आहेत तिकडे लक्ष ठेव आणि या स्त्रियांच्या बरोबरीने त्यांच्यामागे जात राहा. तुला त्रास न देण्याबद्दल मी माणसांना सांगून ठेवले आहे. जेव्हा तुला तहान लागेल, तेव्हा तू जाऊन माणसांनी भरून ठेवलेल्या या रांजणातील पाणी पीत जा.” त्यावर तिने तिचे मुख जमिनीकडे खाली लवून ते मान्य केले. ती त्याला म्हणाली, “मी एक परदेशी असूनही तुम्ही माझ्यावर एवढी कृपादृष्टी का बरे दाखवित आहात?” बवाज म्हणाला, “तुझ्या पतीच्या निधनानंतर तू तुझ्या सासूसाठी जे काही केले ते सर्व मला सांगण्यात आलेले आहे—कशाप्रकारे तू तुझ्या वडिलांकडे आणि आईकडे आणि तुझ्या गावाकडे जाण्याचे मान्य केले नाहीस आणि अशा लोकांबरोबर राहण्यास आली आहेस की, ज्यांना तू ओळखत नाही. तू जे काही केले आहेस त्याचे फळ याहवेह तुला देतील. याहवेह इस्राएलांचे परमेश्वर ज्यांच्या पंखाखाली आश्रय घेण्यास तू आली आहेस, त्यांच्याद्वारे तुला भरपूर मजुरी मिळो.”

