YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 9:1-13

मत्तय 9:1-13 MRCV

येशू एका होडीत चढले आणि सरोवराच्या पलीकडे आपल्या शहरात आले. काही लोकांनी एका पक्षघाती मनुष्याला, खाटेवर ठेऊन त्यांच्याकडे आणले. जेव्हा येशूने त्यांचा विश्वास पाहिला, त्या मनुष्याला म्हणाले, “मुला, धीर धर, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!” त्यांचे विचार येशूंनी ओळखून त्यांना विचारले, “तुम्ही तुमच्या मनामध्ये दुष्टाईने भरलेले विचार का करता? यातून कोणते म्हणणे सोपे आहे, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’ तुम्हाला हे समजण्याची गरज आहे की मानवपुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे.” ते पक्षघाती मनुष्याला म्हणाले, “ऊठ, आपले अंथरूण उचल आणि घरी जा.” तेव्हा तो मनुष्य उठला आणि आपल्या घरी गेला. प्रत्यक्ष घडलेला हा चमत्कार पाहून जमावाला भीती वाटली व ज्यांनी मनुष्यास असा अधिकार दिला त्या परमेश्वराची त्या सर्वांनी स्तुती केली. मग येशू तिथून गेले, येशूंनी मत्तय नावाच्या एका मनुष्याला जकात नाक्यावर बसलेला पाहिले. येशूंनी त्याला म्हटले, “माझ्यामागे ये,” आणि मत्तय उठला आणि त्यांना अनुसरला. नंतर संध्याकाळी येशू आणि त्यांचे शिष्य मत्तयाच्या घरी भोजन करत होते. त्यांच्या पंक्तीला अनेक जकातदार आणि पापी लोक बसले होते. ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?” हे ऐकून, येशू त्यांना म्हणाले, “जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नसते, परंतु रोग्यास असते. ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’ पण दया हवी आहे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.”