YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 13:47-58

मत्तय 13:47-58 MRCV

“आणखी, स्वर्गाचे राज्य मासे धरण्यार्‍या एका जाळ्यासारखे आहे. ते सरोवरात टाकले आणि जाळ्यात सर्वप्रकारचे मासे लागले. जाळे भरल्यावर कोळी लोकांनी ते ओढून काठावर आणले. मग खाली बसून त्यांनी चांगले मासे भांड्यात भरले आणि वाईट मासे फेकून दिले. युगाच्या शेवटीही असेच होईल देवदूत येतील आणि वाईट लोकांना नीतिमान लोकांतून वेगळे करतील. आणि त्यांना जळत्या भट्टीत टाकण्यात येईल जिथे रडणे आणि दातखाणे चालेल. “तुम्हाला या सर्वगोष्टी समजल्या काय?” येशूंनी विचारले. “होय,” ते म्हणाले. मग येशू त्यांना म्हणाले, “म्हणून नियमशास्त्राचा प्रत्येक शिक्षक जो स्वर्गाच्या राज्यात शिष्य झाला आहे, तो त्या घरमालकासारखा आहे जो त्याच्या भांडारातून जुने आणि नवे धन काढतो.” येशूंनी हे दाखले सांगण्याचे संपविल्यावर ते तिथून निघाले. स्वतःच्या गावी येऊन, तेथील सभागृहामध्ये असलेल्या लोकांना त्यांनी शिकविण्यास सुरुवात केली आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, “या मनुष्याला हे ज्ञान व चमत्कार करण्याचे सामर्थ्य कुठून प्राप्त झाले? हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय? याच्या सर्व बहिणी आपल्यातच नाहीत का? मग या मनुष्याला या सर्वगोष्टी कुठून प्राप्त झाल्या?” आणि ते त्याच्यावर संतापले. तेव्हा येशू त्यांना म्हणाले, “संदेष्ट्याचा मान होत नाही असे नाही; फक्त आपले गाव आणि आपले घर यांच्यात तो मान्यता पावत नाही.” आणि त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी त्या ठिकाणी फार चमत्कार केले नाहीत.