मत्तय 12:22-30
मत्तय 12:22-30 MRCV
नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले. तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?” परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.” त्यांचे विचार येशूंना माहीत होते, आणि ते त्यांना म्हणाले, “प्रत्येक फूट पडलेल्या राज्याचा नाश होतो किंवा एखाद्या शहरातील किंवा घरातील लोकांत आपसात फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर टिकू शकत नाही. जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल? आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील. परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे. “किंवा मग, बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याला आधी बांधल्याशिवाय त्याची मालमत्ता लुटून नेणे कसे शक्य होईल? त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. “जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.

