येशूंनी आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलाविले आणि त्यांना अशुद्ध आत्म्यांना घालवून देण्याचा आणि प्रत्येक रोग व आजार बरे करण्याचा अधिकार दिला. त्यांच्या बारा प्रेषितांची नावे ही: शिमोन ज्याला पेत्र असेही म्हणतात आणि त्याचा भाऊ आंद्रिया; जब्दीचा पुत्र याकोब, त्याचा भाऊ योहान; फिलिप्प आणि बर्थलमय; थोमा आणि मत्तय जकातदार; अल्फीचा पुत्र याकोब आणि तद्दय; शिमोन कनानी आणि यहूदाह इस्कर्योत ज्याने येशूंना विश्वासघाताने धरून दिले. येशूंनी बारा प्रेषितांना सूचना देऊन पाठविले: “गैरयहूदी लोकांकडे जाऊ नका किंवा शोमरोन्यांच्या कोणत्याही शहरात प्रवेश करू नका. इस्राएलांच्या हरवलेल्या मेंढराकडे जा. जात असताना, ‘स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे’ अशी घोषणा करा. आजार्यांना बरे करा, मृतांना जिवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूतग्रस्तांतून भुते काढून टाका. तुम्हाला विनामूल्य मिळाले आहे, तुम्हीही विनामूल्य द्या. “प्रवासाला जाताना कमरपट्ट्यात सोने, चांदी किंवा तांबे असे काहीही घेऊ नका. तुमच्या प्रवासासाठी थैली किंवा अधिक अंगरखा किंवा पायतण किंवा काठी घेऊ नका; कारण कामकरी अन्नास पात्र आहे. ज्या एखाद्या शहरात किंवा गावात तुम्ही प्रवेश कराल, त्यावेळी एखाद्या योग्य मनुष्याचा शोध करा आणि निघेपर्यंत त्याच्याच घरी राहा. एखाद्या घरात प्रवेश करताना शुभेच्छा द्या. ते घर योग्य असेल, तर तुमच्या आशीर्वादाप्रमाणे तिथे शांती नांदेल. पण याउलट परिस्थिती असली तर तुमचा आशीर्वाद तुम्हाकडे परत येईल. जर कोणी तुमचे स्वागत केले नाही किंवा तुमचे शब्द ऐकले नाही, तर त्या घरातून किंवा शहरातून निघा आणि तुमच्या पायाची धूळ तिथेच झटकून टाका. मी तुम्हाला निश्चित सांगतो की, न्यायाचा दिवस सदोम व गमोराला त्या नगरापेक्षा अधिक सुसह्य असेल. “मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निर्दोष असा. तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल. तुम्हाला माझ्या नावासाठी त्यांना व गैरयहूदीयांना साक्ष व्हावी म्हणून अधिकारी व राजांसमोर आणले जाईल. तुम्हाला अटक करून नेल्यावर न्यायालयासमोर काय बोलावे व कसे बोलावे याविषयी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला काय बोलावे ते सुचविले जाईल. कारण तुम्ही बोलणार नाही पण तुमच्या पित्याचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल. “भाऊ भावाला, पिता आपल्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील. माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहतील, त्याचे मात्र तारण होईल. तुमचा एका शहरात छळ होऊ लागला की दुसर्या शहरात पळून जा. कारण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, मानवपुत्र येण्याअगोदर इस्राएलाच्या नगरांमधून तुमचे फिरणे संपणारच नाही.
मत्तय 10 वाचा
ऐका मत्तय 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 10:1-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ