लूक 9:18-26
लूक 9:18-26 MRCV
एकदा येशू एकटेच प्रार्थना करीत होते आणि त्यांचे शिष्य जवळच होते. येशूंनी त्यांना विचारले, “मी कोण आहे म्हणून लोकसमुदाय मला ओळखतात?” ते म्हणाले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; आणखी काहीजण म्हणतात, आपण मरणातून उठलेले प्राचीन काळातील संदेष्ट्यांपैकी एक आहात.” “परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही परमेश्वराचे ख्रिस्त आहात.” येशूंनी त्यांना निक्षून आज्ञा केली की हे कोणालाही सांगू नका. ते म्हणाले, “मानवपुत्राला पुष्कळ दुःखे सहन करावी आणि वडीलजन व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जाऊन जिवे मारले जावे आणि तिसर्या दिवशी पुन्हा जिवंत होणे याचे अगत्य आहे.” नंतर ते सर्वांना म्हणाले, “जर कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्याने स्वतःस नाकारावे, दररोज त्याचा क्रूसखांब उचलावा आणि माझ्यामागे यावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवेल तो आपल्या जीवाला मुकेल, पण जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाला गमावेल, तो त्याचा जीव वाचवेल. कोणी सारे जग मिळविले आणि आपल्या स्वतःला गमाविले व नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? ज्या कोणाला माझी व माझ्या वचनाची लाज वाटेल, तर जेव्हा मानवपुत्र पित्याच्या व पवित्र देवदूतांच्या गौरवाने येईन तेव्हा त्यालाही त्याची लाज वाटेल.

