YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यहोशुआ 2:1-14

यहोशुआ 2:1-14 MRCV

त्यानंतर नूनाचा पुत्र यहोशुआने गुप्तपणे शिट्टीम येथून दोन हेर पाठविले. तो म्हणाला, “जा, देशाचे अवलोकन करा, विशेषकरून यरीहोचे.” तेव्हा ते गेले आणि राहाब नावाच्या वेश्येच्या घरी गेले आणि तिथे राहिले. तेव्हा यरीहोच्या राजाला बातमी दिली गेली, “पहा, काही इस्राएली लोक हेरगिरी करण्यासाठी आज रात्री येथे आले आहेत.” तेव्हा यरीहोच्या राजाने राहाबकडे निरोप पाठविला: “जे लोक तुझ्याकडे आले आणि तुझ्या घरी उतरले आहेत त्यांना बाहेर काढ, कारण ते संपूर्ण देशात हेरगिरी करण्यासाठी आले आहेत.” परंतु त्या स्त्रीने त्या दोन्ही पुरुषांना लपवून ठेवले होते. ती म्हणाली, “होय, ते पुरुष माझ्याकडे आले होते, परंतु मला माहीत नव्हते की ते कुठून आले होते. संध्याकाळी शहराच्या वेशी बंद होण्याच्या सुमारास ते निघून गेले. मला माहीत नाही ते कोणत्या मार्गाने गेले. लवकर त्यांच्यामागे जा. तुम्ही त्यांना पकडू शकाल.” परंतु तिने त्यांना घराच्या धाब्यावर वाळत ठेवलेल्या जवसाच्या ताटांच्या ढिगार्‍याखाली लपविले होते. तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या. रात्री ते हेर झोपी जाण्यापूर्वी ती घराच्या धाब्यावर गेली आणि त्यांना म्हणाली, “मला माहीत आहे की, हा देश याहवेहने तुम्हाला दिलेला आहे आणि तुमच्या भीतीमुळे आम्ही धास्तावून गेलो आहोत, म्हणून या देशात राहणारे सर्व लोक तुमच्या भीतीने थरथरत आहेत. कारण जेव्हा तुम्ही इजिप्त देशातून बाहेर पडला त्यावेळेस तुमच्यासाठी तांबड्या समुद्रातून याहवेहने मार्ग कसा तयार केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे आणि यार्देनेच्या पूर्वेस असणार्‍या सीहोन व ओग या दोन अमोर्‍यांच्या राजांचा तुम्ही कसा संपूर्ण नाश केला, याबद्दल आम्ही ऐकले आहे. जेव्हा आम्ही या गोष्टी ऐकल्या, तेव्हा आमची अंतःकरणे भीतीने थरारून गेली आणि प्रत्येकाचे धैर्य थंड पडले, कारण याहवेह जे तुमचे परमेश्वर वर स्वर्गात आहेत ते परमेश्वर पृथ्वीवर सुद्धा आहेत. “तर आता मला याहवेहकडून वचन द्या की तुम्ही माझ्या कुटुंबावर दया दाखवाल, कारण मी तुमच्यावर दया दाखविली आहे. मला खात्रीने एक चिन्ह द्या, की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.” “आम्ही तुमच्या जिवास जीव देऊ!” त्या पुरुषांनी तिला खात्री दिली. “आम्ही जे काही करीत आहोत ते जर तू सांगणार नाहीस, तर जेव्हा याहवेह हा प्रदेश आमच्या हाती देतील, आम्ही तुला दयेने वागवू आणि तुझ्याबरोबर विश्वासू राहू.”