योहान 8:1-12
योहान 8:1-12 MRCV
नंतर येशू जैतुनाच्या डोंगराकडे परतले. अगदी पहाटेच येशू पुन्हा मंदिराच्या अंगणात आले, त्यांच्याभोवती सर्व लोक जमले आणि ते बसून त्यांना शिकवू लागले. नियमशास्त्र शिक्षक व परूशी यांनी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला त्यांच्याकडे आणले. त्यांनी तिला समुदायाच्या पुढे उभे केले आणि ते येशूंना म्हणाले, “गुरुजी, या स्त्रीला व्यभिचाराचे कृत्य करीत असतानाच धरले आहे. मोशेच्या नियमशास्त्रामध्ये आम्हास आज्ञा दिली आहे की अशा स्त्रियांना दगडमार करावा. परंतु आपण काय म्हणता?” ते या प्रश्नाचा उपयोग त्यांना सापळ्यात पकडावे व दोष ठेवण्यास आधार मिळावा म्हणून करत होते. परंतु येशू खाली वाकून बोटाने जमिनीवर लिहू लागले. ते त्यांना प्रश्न विचारत राहिले, तेव्हा येशू सरळ उभे राहून त्यांना म्हणाले, “तुम्हामध्ये जो पापविरहित आहे त्यानेच तिच्यावर प्रथम दगड टाकावा.” मग ते पुन्हा खाली वाकून जमिनीवर लिहू लागले. ज्यांनी हे ऐकले, ते सर्वजण प्रथम वयस्कर व नंतर एका पाठोपाठ एक असे सर्वजण निघून गेले आणि शेवटी येशू एकटेच त्या स्त्रीसोबत राहिले, ती स्त्री अद्याप तिथेच उभी होती. मग येशू सरळ उभे राहून तिला म्हणाले, “बाई, ते कुठे आहेत? तुला कोणीही दोषी ठरविले नाही काय?” ती म्हणाली “कोणी नाही, प्रभू!” येशू जाहीरपणे म्हणाले, “तर मग मीही तुला दोषी ठरवीत नाही. जा आणि तुझे पापमय जीवन सोडून दे.” येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


