YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 4:43-53

योहान 4:43-53 MRCV

दोन दिवसानंतर ते गालील प्रांतात गेले. कारण येशूंनी स्वतः स्पष्टपणे सांगितले होते की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही. ते गालीलात आले, तेव्हा गालिलकरांनी त्यांचे स्वागत केले. कारण वल्हांडण सणाच्या वेळी, ते तिथे उपस्थित होते व यरुशलेममध्ये जे काही येशूंनी केले ते त्यांनी पाहिले होते. गालीलातील काना गावी त्यांनी पुन्हा भेट दिली, येथेच त्यांनी पाण्याचा द्राक्षारस केला होता. ते तिथे असताना, कफर्णहूममध्ये एका शासकीय अधिकार्‍याचा मुलगा आजारी होता. येशू यहूदीयातून गालीलात आले आहेत, हे ऐकून तो त्यांच्याकडे गेला व आपण येऊन माझ्या मुलाला बरे करावे, अशी त्यांना आग्रहाने विनंती केली, कारण तो मुलगा मृत्युशय्येवर होता. तेव्हा येशू म्हणाले, “मी अद्भुते व चिन्हे केल्याशिवाय तुम्ही लोक मजवर विश्वास ठेवणार नाही.” तो शासकीय अधिकारी म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी येण्याची कृपा करा.” येशू त्याला म्हणाले, “जा, तुझा मुलगा जगेल, तो मरणार नाही.” त्या मनुष्याने येशूंच्या वचनावर विश्वास ठेवला आणि निघाला. तो मार्गावर असतानाच, त्याचे काही दास त्याला भेटले आणि आपला मुलगा जिवंत आहे अशी बातमी त्यांनी त्याला दिली. मुलाला कोणत्या वेळेपासून बरे वाटू लागले, अशी त्याने त्यांच्याजवळ चौकशी केली असता त्यांनी उत्तर दिले, “काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्याचा ताप नाहीसा झाला.” तेव्हा त्या पित्याला उमगले की त्याच घटकेस येशूंनी, “तुझा मुलगा जगेल तो मरणार नाही.” हे शब्द उच्चारले होते. मग तो व त्याच्या संपूर्ण कुटुंबाने येशूंवर विश्वास ठेवला.

योहान 4:43-53 साठी चलचित्र