YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 66:1-24

यशायाह 66:1-24 MRCV

याहवेह असे म्हणतात: “स्वर्ग माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी निवासस्थान बांधणार ते कुठे आहे? माझे विश्रांतिस्थान कुठे असणार? माझ्या हाताने हे सर्व घडवले आणि म्हणून ते अस्तित्वात आले नाहीत काय?” अशी याहवेह घोषणा करतात. “ज्यांच्यावर मी प्रसन्न होतो ते असे असतात: जे लीन व भग्न आत्म्याचे आहेत, आणि जे माझ्या वचनांनी कंपित होतात. परंतु जो वेदीवर बैल अर्पण करतो, त्याने ते अर्पण नरबली देण्यासारखेच असते, जो कोणी वेदीवर कोकर्‍याचे होमार्पण करतो तो अशा व्यक्तीसारखा आहे, जो कुत्र्याची मान मोडतो; जो कोणी अन्नार्पण करतो, तो डुकराचे रक्त अर्पण करणाऱ्यासारखा आहे, आणि जो कोणी स्मरणार्थ धूप जाळतो तो एखाद्या मूर्तिपूजकासारखा आहे. त्यांनी आपले मार्ग निवडले आहेत, ते त्यांच्या घृणास्पद गोष्टी करण्यामध्ये धन्यता मानतात; म्हणून मी देखील त्यांच्यासाठी कठोर शिक्षा निवडणार आहे ज्याची त्यांना धास्ती वाटते, तेच मी त्यांच्यावर पाठवेन. कारण मी जेव्हा त्यांना हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर दिले नाही, मी त्यांच्याशी बोललो, तेव्हा कोणीही माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्यासमक्ष दुष्कृत्ये केली आणि मला वीट आणणार्‍या गोष्टी करणे निवडले.” याहवेहची वचने ऐकून कंपित होणार्‍या लोकांनो, याहवेहची वचने ऐका: “तुमचे भाऊबंद जे तुमचा द्वेष करतात, आणि माझ्या नामाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे तुम्हाला वाळीत टाकतात, ते थट्टेने म्हणतात, ‘याहवेहचा गौरव असो, जेणेकरून, आम्ही तुमचा हर्षोल्हास बघू!’ पण ते फजीत केले जातील. शहरामध्ये चाललेला आरडाओरडा ऐका, मंदिरातून येणारा गलबला ऐका! आपल्या शत्रूंची यथायोग्य परतफेड करणाऱ्या याहवेहचा हा ध्वनी आहे. “प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच तिची प्रसूती होईल; वेणा येण्यापूर्वीच ती पुत्र प्रसवेल. असे झालेले कोणी कधी ऐकले आहे का? असे कोणी कधी पाहिले आहे का? एका दिवसात एखादे राष्ट्र जन्मास येते किंवा एका क्षणात एखादे राष्ट्र उत्पन्न होते? तरी देखील सीयोनाच्या प्रसववेदना सुरू होण्यापूर्वीच ती तिच्या संततीस जन्म देते. जन्म देण्याच्या क्षणापर्यंत आणल्यावर, मी प्रसूत करणार नाही काय?” असे याहवेह म्हणतात. “प्रसूतीस आणल्यावर मी उदर बंद करतो काय?” असे परमेश्वर म्हणतात. “यरुशलेमवर प्रीती करणार्‍यांनो, तिच्याबरोबर हर्ष करा व तिच्यासाठी आनंद साजरा करा; तिच्यासाठी शोक करणार्‍या सर्व लोकांनो, तिच्याबरोबर मोठा उल्हास करा. कारण तिच्या सांत्वन करणाऱ्या स्तनाने तुमचे संगोपन होऊन तुम्ही तृप्त व्हाल; तान्हेबाळ मनमुरादपणे मातेचे स्तनपान करते, तसे तुम्हीही तिच्या ओसंडून वाहणाऱ्या विपुलतेत आनंद कराल.” कारण याहवेह असे म्हणतात: “मी तिच्या शांततेस नदीप्रमाणे वाढवेन, आणि राष्ट्रांची समृद्धी ओसंडून वाहणाऱ्या झऱ्यांसारखी करेन; तुमचे संगोपन होईल व तुम्ही तिच्या कडेवर बसून फिराल, आणि तिच्या मांडीवर जोजवले जाल. जसे आई तान्ह्या बाळाचे सांत्वन करते, तसे मी तुमचे सांत्वन करेन; आणि तुम्ही यरुशलेमाप्रीत्यर्थ सांत्वन पावाल.” हे तुमच्या नजरेस पडताच, तुम्हाला आनंदाचे भरते येईल व तुम्ही गवतासारखे बहरून जाल; याहवेहचा कल्याणकारी हात त्यांच्या सेवकांस प्रकट होईल, पण त्यांच्या शत्रूंना त्यांचा क्रोध दाखविण्यात येईल. पाहा, याहवेह आपल्या क्रोधाग्नीसह येत आहेत, आणि त्यांचे रथ वावटळीसारखे आहेत; त्यांचा क्रोध ते प्रकोपासह आणतील, आणि त्यांचे फटकारणे अग्निज्वालांसह असेल. कारण अग्नीने व आपल्या तलवारीने याहवेह सर्व लोकांवरील त्यांचा न्याय अंमलात आणतील, आणि अनेकजण याहवेहद्वारे वधल्या जातील. “जे स्वतःला पवित्र व शुद्ध करतात, ते बागेत जातील, मात्र जे डुकरे, उंदीर यासारखे इतर प्रकारचे निषिद्ध मांस खातात—अशा सर्व लोकांचा भयानक शेवट त्यांनी अनुसरलेल्या लोकांसह होईल,” अशी याहवेह घोषणा करतात. “यास्तव मी सर्व राष्ट्रांतील लोकांना आणि भाषिकांना एकत्र करेन, कारण त्यांनी कोणती योजना केली व कोणती कृत्ये केली आहेत, ते सर्व तिथे येतील व त्यांना माझे गौरव दिसेल. “मी तिथे त्यांच्यामध्ये एक चिन्ह पाठवेन आणि त्यातून जे राष्ट्रांतील अवशिष्ट आहेत, त्यांना मी—तार्शीश, पूल, लूद (धनुर्धारी म्हणून प्रसिद्ध असलेले), तूबाल, यावान या देशांमध्ये व दूरवर असलेल्या द्वीपांवर, जिथे कुठेही माझी किर्ती ज्यांच्या कानी पडली नाही व माझे गौरव ज्यांनी पाहिले नाही, अशा ठिकाणी त्यांना पाठवेन. त्या देशांमध्ये ते माझ्या गौरवाची घोषणा करतील. आणि सर्व राष्ट्रातून, तुमच्या सर्व लोकांना ते यरुशलेममधील माझ्या पवित्र पर्वतावर—घोड्यांवरून, रथातून, डोल्यांतून, खेचरांवरून व उंटावरून याहवेहसाठी अर्पण म्हणून आणतील,” असे याहवेह म्हणतात. “इस्राएल लोक ज्याप्रमाणे अन्नार्पण करतात त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात विधिपूर्वक शुद्ध पात्रात आणतील. आणि परत येणार्‍या या लोकांमधून काहींची माझे याजक व लेवी व्हावे म्हणून मी त्यांची नेमणूक करेन,” असे याहवेह म्हणतात. “मी निर्माण केलेले नवे आकाश व पृथ्वी जसे टिकून राहतील,” याहवेह घोषित करतात, “तसेच तुमचे नाव व तुमची संतती सदासर्वकाळ टिकून राहील. एका नवचंद्राच्या दिवसापासून दुसर्‍या नवचंद्राच्या दिवसापर्यंत आणि एका शब्बाथ दिवसापासून दुसर्‍या शब्बाथ दिवसापर्यंत सर्व मानवजात माझ्यापुढे उपासना करण्यास येतील,” असे याहवेह म्हणतात. “ते बाहेर जातील आणि माझ्याविरुद्ध बंड केलेल्यांची प्रेते पाहतील; कारण त्यांना खाणारे किडे कधी मरणार नाही, त्यांना पेटवणारा अग्नी कधीही विझणार नाही, आणि सर्व मानवजातीला ते अमंगळ दृश्य पाहून किळस येईल.”

यशायाह 66 वाचा