YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशायाह 62:1-12

यशायाह 62:1-12 MRCV

सीयोनचा निर्दोषपणा सूर्योदयासारखा उजळून, मी निःशब्द राहणार नाही, व यरुशलेमचे तारण जळत्या मशालीसारखे सिद्ध होईपर्यंत, मी शांत राहणार नाही. राष्ट्रे तुझा निर्दोषपणा, आणि सर्व राजे तुझे वैभव बघतील; याहवेहच्या मुखाने बहाल केलेल्या नवीन नावाने तुला संबोधण्यात येईल. तू याहवेहच्या हातातील गौरवशाली मुकुट, आणि तुझ्या परमेश्वराच्या हातातील राजेशाही किरीट होशील. यापुढे तुला ते त्याग केलेली असे म्हणणार नाहीत, अथवा तुझ्या भूमीला ओसाड असे म्हणणार नाही. पण हेफसीबा हे तुझे नवे नाव असेल आणि तुझ्या भूमीला बिऊला म्हणतील; कारण याहवेहला तुझ्यामुळे आनंद होईल, आणि तुझी भूमी विवाहित होईल. जसा एक तरुण एका तरुणीशी विवाह करतो, तसाच तुझा निर्माणकर्ता तुझ्याशी विवाह करेल; जसा एखाद्या वराला आपल्या वधूविषयी आनंद होतो, तसाच तुझ्या परमेश्वराला तुझ्यामुळे आनंद होईल. अगे यरुशलेमे, तुझ्या कोटांवर मी पहारेकरी नेमले आहेत; ते रात्री किंवा दिवसा, असे कधीही स्तब्ध राहणार नाहीत. तू जी याहवेहचा धावा करते, स्वतःला विसावा देऊ नको, आणि ते यरुशलेमची पुन्हा स्थापना करेपर्यंत व सर्व पृथ्वीवर तिला स्तुतीस योग्य करेपर्यंत, परमेश्वरालाही विसावा घेऊ देऊ नको. आपल्या उजव्या हाताने आणि त्यांच्या सामर्थ्यशाली भुजेने याहवेहने शपथ वाहिली आहे: “यापुढे मी कधीही तुझे धान्य, त्यांचे अन्न म्हणून तुझ्या शत्रूंच्या स्वाधीन करणार नाही, आणि तू परिश्रम करून काढलेला नवा द्राक्षारस, परकीय येऊन कधीही पिणार नाहीत. परंतु जे पीक काढतील, तेच ते खाईल आणि याहवेहची स्तुती करतील, आणि जे द्राक्ष गोळा करतील, तेच पवित्रस्थानाच्या आवारात द्राक्षारस पितील.” बाहेर पडा! वेशींच्या बाहेर पडा! माझ्या लोकांसाठी मार्ग तयार करा. बांधा, महामार्ग बांधा! दगडधोंडे काढून टाका. राष्ट्रांकरिता ध्वज उंच फडकवा. याहवेहनी पृथ्वीच्या दिगंतापर्यंत घोषणा केली आहे: “सीयोनकन्येला सांगा, ‘पाहा, तुझे उद्धारकर्ता येत आहेत! पाहा, त्यांचे बक्षीस त्यांच्याकडे आहे, आणि त्यांची भरपाई त्यांच्यासोबत आहे.’ ” त्यांना पवित्र लोक, याहवेहने खंडणी भरून सोडविलेले, असे म्हणण्यात येईल, आणि तुला खूप मागणी असलेला देश, कधीही न टाकलेले नगर असे म्हणतील.

यशायाह 62 वाचा