निर्गम 4:1-16
निर्गम 4:1-16 MRCV
मोशेने उत्तर दिले, “जर त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही किंवा माझे ऐकले नाही आणि म्हणाले, ‘याहवेह तुला प्रकट झालेच नाही’ तर मी काय करावे?” याहवेहने त्याला विचारले, “तुझ्या हातात काय आहे?” त्याने उत्तर दिले, “एक काठी!” याहवेह त्याला म्हणाले, “ती जमिनीवर टाक.” मोशेने ती जमिनीवर टाकली आणि तिचा साप झाला आणि मोशे भिऊन त्यापासून दूर पळाला. मग याहवेहने त्याला सांगितले, “हात लांब करून सापाचे शेपूट धर.” तेव्हा मोशेने त्या सापाला धरले आणि तो पुन्हा त्याच्या हातातील काठी झाला. याहवेहने मोशेला सांगितले “हे अशासाठी की याहवेह त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर—अब्राहामाचे परमेश्वर, इसहाकाचे परमेश्वर आणि याकोबाचे परमेश्वर—यांचे तुला निश्चितच दर्शन झाले आहे.” मग याहवेह त्याला म्हणाले, “तुझा हात तुझ्या झग्याच्या आत घाल.” मग मोशेने आपला हात आपल्या झग्याच्या आत घातला आणि जेव्हा त्याने हात बाहेर काढला, त्याची कातडी कोडाने भरली; तो हिमासारखा पांढरा झाला होता. “आता परत आपला हात झग्याच्या आत घाल,” याहवेह म्हणाले आणि मोशेने परत आपला हात झग्याच्या आत घातला, आणि जेव्हा तो बाहेर काढला, तो पूर्ववत त्याच्या शरीराच्या बाकीच्या कातडीप्रमाणे झाला. तेव्हा याहवेह म्हणाले, “पहिले चिन्ह पाहून जर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर दुसरे चिन्ह पाहून कदाचित ते विश्वास ठेवतील. पण या दोन्ही चिन्हांवर त्यांनी विश्वास ठेवला नाही तर तू नाईल नदीचे पाणी घेऊन ते कोरड्या जमिनीवर ओत म्हणजे नदीतून घेतलेल्या पाण्याचे जमिनीवर रक्त होईल.” मोशे याहवेहला म्हणाला, “आपल्या सेवकास क्षमा करावी, प्रभू मी चांगला वक्ता नाही, कधीही नव्हतो आणि आपण माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलत होता तेव्हाही नाही. मी मुखदुर्बल व जिभेचा जड आहे.” याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का? आता जा; मी तुला बोलण्यास मदत करेन आणि काय बोलावे ते तुला शिकवेन.” पण मोशे म्हणाला, “तुमच्या सेवकास क्षमा करावी, प्रभू. कृपा करून दुसर्या कोणाला पाठवा.” तेव्हा मोशेविरुद्ध याहवेहचा राग भडकला, ते म्हणाले, “लेवी अहरोन, तुझा भाऊ, याच्याविषयी काय? मला ठाऊक आहे की तो चांगले बोलू शकतो. तो तुला भेटावे म्हणून मार्गावर आहे, तुला पाहून त्याला फार आनंद होईल. तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी तुम्हा दोघांना बोलण्यास मदत करेन, आणि काय करावे हे शिकवेन. तो तुझ्या वतीने लोकांबरोबर बोलेल, जसे तो तुझेच मुख आहे व तू त्याला परमेश्वरासारखा होशील असे मी करेन.

