इफिसकरांस 2:1-9
इफिसकरांस 2:1-9 MRCV
तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता. त्यामध्ये तुम्ही जगाच्या रीतीप्रमाणे वागत होता व आकाशमंडळातील शासक आत्मा जो प्रत्यक्ष या क्षणीही आज्ञा न पाळणार्यांमध्ये कार्य करीत आहे, त्याच्यामागे चालणारे होता. एकेकाळी आपणही त्यामध्ये जगत होतो. आपल्यामधील दैहिक वासना आणि विचार यांचे अनुसरण करणार्यांप्रमाणेच नैसर्गिकरित्या परमेश्वराच्या क्रोधास पात्र होतो. परंतु परमेश्वर हे दयेचे सागर आहेत व आपल्यावरील त्यांच्या अपरंपार प्रीतीमुळे, आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे. आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसविले आहे. यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे. कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्याकडून झाले नाही तर ते परमेश्वराचे दान आहे, कृत्याद्वारे नव्हे; त्यामुळे कोणी गर्व करू शकत नाही.


