YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 9:3-9

1 राजे 9:3-9 MRCV

याहवेह शलोमोनला म्हणाले: “तू माझ्यासमोर केलेली प्रार्थना व विनंती मी ऐकली आहे; हे जे मंदिर तू बांधले आहे तिथे सर्वकाळासाठी माझे नाव देऊन मी ते पवित्र केले आहे. त्यावर माझी दृष्टी व माझे हृदय सदा राहील. “तुझ्या बाबतीत म्हणायचे तर तू आपला पिता दावीद याच्याप्रमाणे माझ्यासमोर विश्वासूपणे हृदयाच्या सरळतेने चालशील आणि सर्वकाही मी आज्ञापिल्याप्रमाणे करशील व माझे विधी व नियम पाळशील, तर इस्राएलवरचे तुझे राजासन मी सर्वकाळासाठी प्रस्थापित करेन, तुझा पिता दावीद याला मी अभिवचन देत म्हटले होते, ‘इस्राएलच्या राजासनावर तुझा वारस कधीही खुंटणार नाही.’ “पण जर तू किंवा तुझी संतती माझ्यापासून दूर वळली आणि मी तुला दिलेल्या आज्ञा व विधी पाळले नाही आणि जाऊन इतर दैवतांची सेवा करून त्यांची उपासना केली, तर जो देश मी त्यांना दिला आहे त्यातून मी इस्राएली लोकांना छेदून टाकीन आणि हे मंदिर जे मी माझ्या नावासाठी पवित्र केले आहे त्याचा मी धिक्कार करेन. मग इस्राएल सर्व लोकांमध्ये थट्टा व निंदेचा विषय होतील. हे मंदिर ढेकळ्यांचा ढिगारा होईल. त्याच्या जवळून जाणारे सर्वजण आश्चर्यचकित होऊन तुच्छतेने म्हणतील, ‘याहवेहने या देशाचे व या मंदिराचे असे का केले आहे?’ तेव्हा लोक उत्तर देतील, ‘याहवेह त्यांचे परमेश्वर, ज्यांनी या लोकांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणले त्या याहवेहला सोडून ते इतर दैवतांची उपासना व सेवा करू लागले आहेत; म्हणून याहवेहने त्यांच्यावर हे अरिष्ट आणले आहे.’ ”

1 राजे 9 वाचा