रोमकरांना 4:16-24
रोमकरांना 4:16-24 MACLBSI
ह्या कारणामुळे ते अभिवचन कृपेवर आधारित असावे म्हणून ते श्रद्धेवर अवलंबून असते. अशासाठी की, ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहाम ह्याचा जो विश्वास होता, त्याच्या श्रद्धेत जे सहभागी होतात, त्यांनाही उपलब्ध व्हावे. ‘मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे’, असे अब्राहामविषयी धर्मशास्त्रात जे लिहिलेले आहे, त्याप्रमाणे तो देवासमक्ष आपल्या सर्वांचा बाप आहे. त्याने जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला आज्ञा करून अस्तित्वात आणतो, अशा देवावर विश्वास ठेवला. ‘आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती होईल’, ह्या धर्मशास्त्रवचनाप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही विश्वास ठेवला. आपल्या शरीराची वयोवृद्ध अवस्था (तो सुमारे शंभर वर्षांचा होता) व सारा हिच्या गर्भाशयाची अक्षमता ह्या गोष्टी लक्षात घेऊनही तो विश्वासात दुर्बल झाला नाही. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने दृढ होऊन त्याने देवाचा गौरव केला. देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे, अशी त्याची पक्की धारणा होती. म्हणूनच ‘ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.’ ‘ते त्याच्याकडे नीतिमत्व असे गणण्यात आले’, हे विधान केवळ त्याच्यासाठी नव्हे, तर आपल्या प्रभू येशूला ज्याने मेलेल्यांमधून उठविले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या आपणासाठीदेखील ते लिहिलेले आहे, त्या आपणासाठीसुद्धा ते नीतिमत्व म्हणून गणले जाणार आहे.

