मला प्रभूमध्ये जीवनात मोठा आनंद होत आहे. त्यामुळेच आता बऱ्याच काळानंतर तुमची माझ्याविषयीची आपुलकी पुन्हा जागृत झाली. ही आपुलकी संपुष्टात आली होती असे नव्हे, पण तुम्हांला संधी मिळत नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही. ज्या स्थितीत मी आहे, त्या स्थितीत मी समाधानी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे व संपन्नतेतही राहणे मी शिकलो आहे, ज्यामुळे कुठेही, कधीही मी समाधानी असतो, म्हणजे मी तृप्त असो किंवा भुकेला असो, विपुलतेत असो किंवा गरजेत असो. मला सामर्थ्य देणाऱ्या ख्रिस्ताद्वारे मी सर्व काही करू शकतो. तथापि माझ्या संकटांत तुम्ही सहभागी झालात, हे ठीक केले. फिलिप्पै येथील ख्रिस्ती लोकांनो, तुम्हांला ठाऊक आहे की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो, तेव्हा तुमच्यावाचून दुसऱ्या कोणत्याही ख्रिस्तमंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेस्सलनीकात होतो, तेव्हा तुम्ही अनेकदा माझी गरज भागवली. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या खात्यात तुमची जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो. माझ्याजवळ सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदीतच्या हाती तुम्ही जे पाठविले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काही सुगंधित समर्पण असून देवाला मान्य व संतोषकारक यज्ञ असे आहे. माझा देव ख्रिस्त येशूमधील त्याच्या वैभवशाली समृद्धीनुसार तुमची सर्व गरज भागवील. आपल्या देवपित्याचा युगानुयुगे गौरव होवो. आमेन. ख्रिस्त येशूमधील प्रत्येक पवित्र व्यक्तीला शुभेच्छा द्या. माझ्या बरोबरचे बंधू तुम्हांला शुभेच्छा देतात. सर्व पवित्र जन व विशेषकरून राजघराण्यातील सर्व तुम्हांला शुभेच्छा पाठवितात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर राहो.
फिलिप्पैकरांना 4 वाचा
ऐका फिलिप्पैकरांना 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: फिलिप्पैकरांना 4:10-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ