YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 4:13-34

मार्क 4:13-34 MACLBSI

त्याने त्यांना पुढे विचारले, “हा दाखला तुम्हांला समजला नाही काय? तर मग इतर दाखले तुम्हांला कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. काही लोक वाटेवर पडलेल्या वचनासारखे आहेत. त्यांनी वचन ऐकल्याबरोबर सैतान येतो व त्यांच्यात पेरलेले वचन हिरावून घेतो. इतर काही लोक खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात. पण त्यांचे मूळ खोलवर न गेल्यामुळे ते अल्पकाळ टिकाव धरतात. त्या वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते तत्क्षणी वचन सोडून देतात. इतर काही लोक काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखे आहेत. ते वचन ऐकून घेतात. परंतु प्रपंचाची चिंता, पैशाचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. आणखी काही लोक चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखे आहेत. हे लोक वचन ऐकून ते स्वीकारतात आणि कोणी तीसपट, कोणी साठपट, तर कोणी शंभरपट असे पीक देतात.” आणखी त्याने त्यांना विचारले, “दिवा मापाखाली किंवा खाटेखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? जे गुप्त ठेवण्यात आले आहे, ते प्रकट केले जाईल; जे झाकून ठेवण्यात आले आहे, ते उघड केले जाईल. ज्याला ऐकण्यासाठी कान असतील, त्याने ऐकावे!” पुढे तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जे काही ऐकता, त्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्या मापाने द्याल त्या मापाने तुम्हांला दिले जाईल आणि त्याहीपेक्षा अधिक दिले जाईल; कारण ज्याच्याकडे आहे, त्याला दिले जाईल व ज्याच्याकडे नाही, त्याचे असेल नसेल तेही त्याच्याकडून काढून घेतले जाईल.” आणखी तो म्हणाला, “देवाचे राज्य असे आहे की, जणू काही एखादा माणूस जमिनीत बी पेरतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी कसे रुजते व वाढते, हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते - प्रथम अंकुर, मग कणीस, नंतर कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा चालवतो, कारण कापणीची वेळ आलेली असते.” येशूने विचारले, “आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी? अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, तरी पेरल्यावर उगवून सर्व रोपट्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठ्या फांद्या फुटतात की, आकाशातील पक्ष्यांना त्याच्या सावलीत वसती करता येते.” असे पुष्कळ दाखले देऊन, त्यांच्या ग्रहणशक्‍तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे. दाखल्याशिवाय तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तरी पण एकान्ती तो त्याच्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.

मार्क 4:13-34 साठी चलचित्र