YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मार्क 4:1-12

मार्क 4:1-12 MACLBSI

येशू पुन्हा गालील सरोवराच्या किनाऱ्यावर प्रबोधन करू लागला. त्याच्याजवळ इतका विशाल समुदाय जमला की, तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला. सर्व लोक सरोवराच्या काठी जमिनीवर होते. तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला. तो त्यांना म्हणाला, “ऐका, एक पेरणारा पेरणी करायला निघाला. तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले. ते पक्ष्यांनी खाऊन टाकले. काही बी खडकाळ जमिनीत पडले. तेथे फारशी माती नव्हती. माती खोल नसल्यामुळे ते बी लवकर उगवले. सूर्य वर आल्यावर ते उन्हाने करपले. मुळे खोल गेलेली नसल्यामुळे ते वाळून गेले. काही बी काटेरी झुडपांत पडले. काटेरी झुडपे वाढल्यामुळे त्याची वाढ खुंटली म्हणून त्याला पीक आले नाही. परंतु काही बी चांगल्या जमिनीत पडले. ते उगवले. मोठे झाले व त्याला पीक आले. काहींना तीसपट, काहींना साठपट, तर काहींना शंभरपट असे पीक आले.” पुढे येशू म्हणाला, “ज्यांना ऐकण्यासाठी कान असतील त्यांनी ऐकावे!” येशू एकान्ती असता त्याचे प्रबोधन ज्यांनी ऐकले होते, त्यांपैकी काहींनी बारा जणांसह त्याच्याकडे येऊन त्याला ह्या दाखल्याविषयी विचारले. त्याने त्यांना उत्तर दिले, “देवाच्या राज्याचे रहस्य तुम्हांला समजावून दिले आहे. परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगण्यात येते. अशासाठी की, त्यांनी पाहावे पण त्यांना आकलन होऊ नये; ऐकून घ्यावे पण त्यांना समजू नये; म्हणजे त्यांनी देवाकडे पुन्हा वळू नये व त्यांना क्षमा मिळू नये.”

मार्क 4:1-12 साठी चलचित्र