मत्तय 8:1-13
मत्तय 8:1-13 MACLBSI
येशू डोंगरावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या मागे लोकांच्या झुंडी जाऊ लागल्या. त्या वेळी एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्याच्या पाया पडून त्याला म्हणाला, “प्रभो, आपली इच्छा असली तर मला शुद्ध करायला आपण समर्थ आहात.” येशूने त्याच्यावर हात ठेवून त्याला स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे. शुद्ध हो.” लगेच त्याचे कुष्ठ जाऊन तो बरा झाला. नंतर येशूने त्याला म्हटले, “पाहा, हे कोणाला सांगू नकोस; तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि तू बरा झालास ह्याचे सर्वांना प्रमाण म्हणून मोशेने नेमलेले अर्पण कर.” येशू कफर्णहूमला आल्यावर एका शताधिपतीने येशूकडे येऊन विनंती केली, “प्रभो, माझा नोकर पक्षाघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे.” येशू त्याला म्हणाला, “मी येऊन त्याला बरे करीन.” त्या रोमन अधिकाऱ्याने उत्तर दिले, “प्रभो, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. आपण शब्द मात्र बोला आणि माझा नोकर बरा होईल. मीही जबाबदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली सैनिक असून मी एकाला जा म्हटले की, तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की, तो येतो, माझ्या नोकराला अमुक कर म्हटले की, तो तसे करतो.” हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात कुठेही आढळला नाही. मी तुम्हांला सांगतो, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांच्या बरोबर बसतील; परंतु स्वर्गाच्या राज्याचे वारसदार बाहेरील अंधारात टाकले जातील. तेथे आक्रोश केला जाईल व दात ओठ खाणे चालेल.” नंतर येशू रोमन अधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुझ्यासाठी होवो.” त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला.


