मत्तय 28:10-20
मत्तय 28:10-20 MACLBSI
येशूने त्यांना म्हटले, “भिऊ नका, जा. माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालीलमध्ये जावे, तेथे ते मला पाहतील.” त्या स्त्रिया जात असता, पहारेकऱ्यांतील कित्येकांनी शहरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. त्यांनी व वडीलजनांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले, “‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले’, असे तुम्ही म्हटले पाहिजे. ही गोष्ट राज्यपालांच्या कानांवर गेली तर तुम्ही निर्दोष आहात, अशी आम्ही त्यांची समजूत घालू आणि तुम्हांला संरक्षण देऊ.” त्यांनी पैसे घेतले व त्यांना शिकवल्याप्रमाणे केले. ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरवण्यात आली, ती आजपर्यंत प्रचलित आहे. इकडे येशूचे अकरा शिष्य गालीलातील ज्या डोंगरावर येशूने त्यांना जायला सांगितले होते, त्यावर गेले. त्यांनी त्याला तेथे पाहून त्याची आराधना केली. मात्र त्यांच्यापैकी काही जणांना शंका आली. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. म्हणून तुम्ही जा, सर्व राष्ट्रांतील लोकांना माझे शिष्य करा, त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हांला आज्ञापूर्वक सांगितले आहे, ते सर्व त्यांना पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या अंतापर्यंत मी सर्वदा तुमच्याबरोबर आहे.”


