मत्तय 2:13-21
मत्तय 2:13-21 MACLBSI
ते गेल्यावर प्रभूचा दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, मुलाला व त्याच्या आईला घेऊन मिसर देशास पळून जा. मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध घेणार आहे.” योसेफ उठला आणि बाळ व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला. हेरोदच्या मृत्यूपर्यंत तो तेथे राहिला. “मी माझ्या पुत्राला मिसर देशातून बोलावले आहे”, हे भाकीत पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. ज्ञानी लोकांनी आपल्याला फसवले, हे पाहून हेरोद अतिशय संतापला आणि ज्ञानी पुरुषांकडून काळजीपूर्वक विचारून घेतलेल्या वेळेनुसार त्याने बेथलेहेममध्ये व आसपासच्या परिसरात माणसे पाठवली व त्यांच्याकडून जे दोन वर्षांचे व त्याहून कमी वयाचे मुलगे होते त्या सर्वांना ठार मारले. यिर्मया संदेष्ट्याद्वारे जे सांगितले होते, ते त्या समयी पूर्ण झाले. ते असे: राम्हा येथे रडणे व मोठा आकांत ऐकण्यात आला; राहेल आपल्या मुलांकरता रडत आहे आणि ती नाहीत म्हणून काही केल्या तिचे सांत्वन होईना. हेरोद मरण पावल्यावर, प्रभूचा दूत मिसर देशात गेलेल्या योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशास जा कारण बाळाचा जीव घ्यायला जे टपले होते, ते मेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएल देशात परत गेला.

