योहानविषयीचे वृत्त ऐकून येशू तेथून तारवात बसून अरण्यात एकांती जाण्यासाठी निघाला. हे समजताच आपापल्या नगरांतून लोक त्याच्या मागे पायी गेले. तो बाहेर आला तेव्हा त्याने विशाल लोकसमुदाय पाहिला. त्याला त्याचा कळवळा आला व त्यांच्यांतील आजारी लोकांना त्याने बरे केले. दिवस उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही एकाकी जागा आहे व वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावात जाऊन स्वतःकरता खायला विकत घ्यावे म्हणून त्यांना निरोप द्या.” येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जायची गरज नाही, तुम्ही त्यांना खायला द्या.” ते त्याला म्हणाले, “आमच्याजवळ केवळ पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते इकडे माझ्याजवळ आणा.” त्याने लोकसमुदायाला गवतावर बसायला सांगितले. नंतर त्या पाच भाकरी व ते दोन मासे घेऊन त्याने स्वर्गाकडे पाहून आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडून शिष्यांना दिल्या. शिष्यांनी त्या लोकसमुदायाला वाटल्या. जमलेले सर्व लोक जेवून तृप्त झाले. शिष्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या. जेवणाऱ्यांमध्ये सुमारे पाच हजार पुरुष होते. शिवाय स्त्रिया व मुले होती, ती निराळीच. “मी लोकसमुदायाला निरोप देत आहे तोवर तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे सरोवराच्या पलीकडे जा”, असे म्हणून त्याने शिष्यांना पाठवून दिले. लोकसमुदायाला निरोप दिल्यावर तो प्रार्थना करायला डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. काठापासून बरेच दूर आलेले तारू लाटांमुळे हेलकावे खाऊ लागले, कारण वारा विरुद्ध दिशेचा होता. पहाटेस तीन ते सहाच्या दरम्यान तो पाण्यावर चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला पाण्यावर चालताना पाहून घाबरून ओरडू लागले, “भूत आहे.” परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे. भिऊ नका.” पेत्र पुढे होऊन म्हणाला, “प्रभो, खरोखरच आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे यायची मला आज्ञा करा.” त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला. परंतु जोरदार वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला तसा तो ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” ते दोघे तारवात चढल्यावर वारा पडला. जे तारवात होते, ते येशूला नमन करून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहात.” ते सरोवराच्या पलीकडे जाऊन गनेसरेतच्या भागात किनाऱ्यावर उतरले. तेथल्या लोकांनी त्याला ओळखून आसपासच्या परिसरात माणसे पाठवून सर्व आजारी लोकांना त्याच्याकडे आणले. “केवळ तुमच्या वस्त्राच्या किनारीला आम्हांला स्पर्श करू द्या”, अशी त्यांनी येशूला विनंती केली आणि जेवढ्या लोकांनी त्याला स्पर्श केला, तेवढे लोक बरे झाले.
मत्तय 14 वाचा
ऐका मत्तय 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 14:13-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ