YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 13:18-35

मत्तय 13:18-35 MACLBSI

तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. जो स्वर्गाच्या राज्याचे वचन ऐकतो पण त्याला ते समजत नाही तो वाटेवर पडलेल्या बीप्रमाणे आहे. त्याच्या अंतःकरणात जे पेरले होते ते सैतान येऊन हिरावून घेतो. जो वचन ऐकतो व ते आनंदाने तत्काळ ग्रहण करतो, तो खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. परंतु ते त्याच्या अंतःकरणात खोल मूळ धरत नाही म्हणून तो थोडाच वेळ टिकतो; देवाच्या शब्दामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो विचलित होतो. जो वचन ऐकतो, पण संसाराची चिंता व पैशाच्या मोहामुळे ज्याच्यात वचनाची वाढ खुंटते व जो निष्फळ राहतो, तो काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखा आहे. जो वचन ऐकून ते समजून घेतो, तो चांगल्या जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. त्याचे पीक मिळते - कुठे शंभरपट, कुठे साठपट, तर अन्यत्र तीसपट.” त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला ठेवत येशू म्हणाला, “स्वर्गाचे राज्य अशा प्रकारचे आहे:एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले. परंतु सर्व झोपलेले असताना त्याचावैरी आला आणि गव्हामध्ये निदण पेरून गेला. जेव्हा रोपटी वाढली व कणसे आली तेव्हा निदणही वाढलेले दिसू लागले. तेव्हा त्या माणसाच्या नोकरांनी येऊन त्याला विचारले, “धनी, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले असताना त्यात निदण कोठून आले?’ तो त्यांना म्हणाला, “हे काम कोणा वैऱ्याचे आहे.’ नोकरांनी त्याला म्हटले, “आम्ही जाऊन ते निदण गोळा करावे, अशी आपली इच्छा आहे काय?’ परंतु तो मनुष्य म्हणाला, “नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूदेखील उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीच्या वेळी मी कापणाऱ्यांना सांगेन की, प्रथम निदण गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा आणि नंतर गहू गोळा करून माझ्या कोठारात साठवा.’” येशूने त्यांच्यापुढे आणखी एक दाखला ठेवला तो असा: “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे, तो एका माणसाने आपल्या शेतात लावला. तो सर्व दाण्यांमध्ये जरी लहान असला, तरी उगवल्यावर सर्व रोपट्यांमध्ये मोठा होऊन त्याचे झाड होते आणि आकाशातील पक्ष्यांना त्याच्या फांद्यांवर वसती करता येते.” येशूने त्यांना आणखी एक दाखला सांगितला. “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे. ते एका स्त्रीने तीन मापे पिठामध्ये मिसळले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगले.” दाखले देऊन येशूने लोकसमुदायांना या सर्व गोष्टी सांगितल्या. दाखल्यांशिवाय तो लोकांना कोणताही उपदेश करत नसे. ‘मी त्यांच्याशी बोलताना दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे अज्ञात आहे, ते प्रकट करीन’, असे संदेष्ट्याद्वारे जे सांगितले गेले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून हे घडले.