मत्तय 12:22-30
मत्तय 12:22-30 MACLBSI
एकदा आंधळा व मुका असलेल्या एका भूतग्रस्ताला येशूकडे आणण्यात आले. येशूने त्याला बरे केले आणि तो पाहू व बोलू लागला. तेव्हा सर्व लोकसमुदाय आश्चर्यचकित होऊन म्हणाला, “हा दावीदचा पुत्र असेल काय?” परंतु परुशी हे ऐकून म्हणाले, “भुतांचा अधिपती बालजबूल त्याला साहाय्य करतो म्हणून भुते काढणे त्याला शक्य होते.” त्याने त्यांच्या मनातील विचार ओळखून त्यांना म्हटले, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा कुटुंब टिकत नाही. सैतान सैतानाशीच लढत असेल तर त्याच्या राज्यात फूट पडली आहे. मग त्याचे राज्य कसे टिकणार? मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढत असेन, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग तुम्ही चुकत आहात, हे तेच तुम्हांला दाखवून देतील! मात्र मी देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भुते काढत आहे, त्याअर्थी देवाचे राज्य तुमच्यासाठी आले आहे. किंवा बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता कुणालाही लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. जो माझ्या बाजूचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करत नाही, तो उधळून टाकतो.

