YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 8:1-12

योहान 8:1-12 MACLBSI

येशू ऑलिव्ह डोंगरावर गेला. भल्या पहाटेस तो पुन्हा मंदिरात गेला. तेव्हा लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. व्यभिचार करत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुशी ह्यांनी त्या वेळी त्याच्याकडे आणले. तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, “गुरुजी, ही स्त्री प्रत्यक्ष व्यभिचार करत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हांला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्याला दोष लावायला आपल्याला काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. परंतु येशू ओणवा होऊन बोटाने जमिनीवर लिहू लागला. ते त्याला एकसारखे प्रश्न विचारत असता, तो उभा राहून त्यांना म्हणाला, “तुमच्यांत जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिला दगड मारावा.” तो पुन्हा ओणवा होऊन जमिनीवर लिहू लागला. हे ऐकून वयोवृद्ध माणसांपासून सुरुवात करून शेवटच्या माणसापर्यंत ते सर्व एक एक असे निघून गेले. येशू एकटा राहिला आणि ती स्त्री तेथेच मध्ये उभी होती. येशू पुन्हा उभा राहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दोषी ठरवले नाही काय?” ती म्हणाली, “प्रभो, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दोषी ठरवत नाही, जा, ह्यापुढे पाप करू नकोस.”] येशू पुन्हा परुशी लोकांना म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”