YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांना 5:21-33

इफिसकरांना 5:21-33 MACLBSI

ख्रिस्ताचा आदर बाळगून एकमेकांच्या अधीन असा. पत्नींनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन, तशा तुमच्या पतीच्या अधीन असा. जसा ख्रिस्त हा ख्रिस्तमंडळीचे मस्तक आहे, तसा पती हा पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त हाच ख्रिस्तमंडळीचा म्हणजेच त्यांच्या शरीराचा तारणारा आहे. म्हणून ख्रिस्तमंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे पत्नींनीही सर्व गोष्टींत त्यांच्या पतीच्या अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीसाठी स्वतःचे समर्पण केले. अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे बाप्‍तिस्म्याने स्वच्छ करून पवित्र करावे, म्हणजे त्याने तिला सर्व वैभवासह स्वत:ला सादर करावे. म्हणजेच ती शुद्ध व निर्दोष असावी; तिला सुरकुती किंवा इतर काही कलंक नसावा. अशा प्रकारे पतीने त्याची पत्नी त्याचेच शरीर आहे, असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करत नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो, अगदी ख्रिस्त ख्रिस्तमंडळीचे पालनपोषण करतो तसे; कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील.’ हे रहस्य महान आहे पण मी ख्रिस्त व ख्रिस्तमंडळी ह्यांच्याविषयी बोलत आहे. तथापि तुम्हांलाही ते लागू पडते. प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा.