बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 9:32-42

प्रेषितांचे कार्य 9:32-42 MACLBSI

पेत्र सर्वत्र फिरत असता लोद गावात जे पवित्र जन राहत होते त्यांच्याकडेही तो गेला. तेथे त्याला ऐनेयास नावाचा एक मनुष्य आढळला. त्याला पक्षाघात झाल्यामुळे तो आठ वर्षे अंथरुणाला खिळलेला होता. त्याला पेत्राने म्हटले, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करत आहे, ऊठ व स्वतः आपले अंथरूण नीटनेटके कर.” तो तत्काळ उठला. त्याला पाहून लोद व शारोन येथील सर्व रहिवासी प्रभूकडे वळले. आणखी यापोमध्ये टबीथा (ग्रीक भाषेत दुर्कस म्हणजेच हरिणी) नावाची कोणी एक स्त्री होती. ती सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर असे. त्या दिवसांत ती आजारी पडून निधन पावली, तिला आंघोळ घालून माडीवरच्या खोलीत ठेवण्यात आले. लोद हे गाव यापोजवळ असल्यामुळे पेत्र तेथे आहे, असे जेव्हा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांनी दोघा जणांना पाठवून त्याला विनंती केली की, “आमच्याकडे यायला उशीर करू नकोस.” पेत्र उठून त्यांच्याबरोबर गेला. तेथे पोहचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले, त्याच्यासभोवती सर्व विधवा जमा झाल्या आणि दुर्कस त्यांच्याजवळ असता, ती जे अंगरखे व जी वस्त्रे तयार करत असे ती त्यांनी रडत रडत त्याला दाखवली. पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली मग शवाकडे वळून म्हटले, “टबीथा, ऊठ.” तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. त्याने तिला हात देऊन उठवले आणि पवित्र जनांना व विधवांना बोलावून त्यांच्यापुढे तिला जिवंत असे उभे केले. यापोमधील सर्वांना हा चमत्कार कळला आणि पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.

प्रेषितांचे कार्य 9:32-42 साठी चलचित्र