YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 9:10-19

प्रेषितांचे कार्य 9:10-19 MACLBSI

इकडे दिमिष्क नगरात हनन्या नावाचा एक शिष्य होता, त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, “हनन्या!” त्याने म्हटले, “काय प्रभो?” प्रभू त्याला म्हणाला, “उठून सरळ नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तार्स येथील शौल नावाच्या मनुष्याचा शोध घे. पाहा, तो प्रार्थना करत आहे, आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने दृष्टान्तात पाहिले.” हनन्याने उत्तर दिले, “प्रभो, यरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे ह्या माणसाने किती वाईट केले आहे, हे मी पुष्कळांकडून ऐकले आहे आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बेड्या घालाव्यात असा अधिकार त्याला महायाजकांकडून मिळाला आहे.” परंतु प्रभूने त्याला म्हटले, “जा, परराष्ट्रीय, राजे व इस्राएलची प्रजा ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता मी त्याला निवडले आहे. माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागते, हे मी त्याला दाखवीन.” हे ऐकून हनन्या निघाला आणि त्या विशिष्ट घरी गेला. शौलाच्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला, “भाऊ शौल, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने मला पाठवले आहे.” त्याच्या डोळ्यांवरून खपल्यांसारखे काही पडले व त्याला दृष्टी आली. त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली. ह्यानंतर तो दिमिष्क नगरात शिष्यांबरोबर काही दिवस राहिला.

प्रेषितांचे कार्य 9:10-19 साठी चलचित्र