प्रेषितांचे कार्य 7:51-60
प्रेषितांचे कार्य 7:51-60 MACLBSI
स्तेफन पुढे म्हणाला, “अहो ताठ मानेच्या आणि हृदयाची व कानांची सुंता न झालेल्या लोकांनो, तुम्ही तर पवित्र आत्म्याला नेहमी विरोध करता. जसे तुमचे पूर्वज, तसेच तुम्हीही. ज्याचा छळ तुमच्या पूर्वजांनी केला नाही, असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान सेवकाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले, त्यांना तुमच्या पूर्वजांनी ठार मारले आणि आता तुम्ही प्रत्यक्ष त्याला धरून देणारे व ठार मारणारे निघाला आहात. तुम्हांला देवदूतांच्याद्वारे नियमशास्त्र देण्यात आले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे हे भाषण न्यायसभेच्या सदस्यांच्या अंतःकरणाला इतके झोंबले की, ते त्याच्यावर दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन स्तेफनने आकाशाकडे पाहिले, तेव्हा देवाचे वैभव व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. स्तेफन म्हणाला, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे!” ते मोठ्याने ओरडून व कान झाकून एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले. ते त्याला शहराबाहेर घालवून दगड मारू लागले, साक्षीदारांनी त्यांचे कपडे शौल नावाच्या एका तरुणाच्या पायांजवळ ठेवले होते. ते दगड मारत असताना स्तेफन प्रभूचा धावा करत म्हणाला, “हे प्रभो येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” त्यानंतर गुडघे टेकून त्याने आर्त विनवणी केली, “हे प्रभो, हे पाप त्यांच्या लेखी मोजू नकोस!” ह्या प्रार्थनेनंतर त्याने प्राण सोडला.

