प्रेषितांचे कार्य 4:4-12
प्रेषितांचे कार्य 4:4-12 MACLBSI
वचन ऐकणाऱ्यांतील पुष्कळांनी विश्वास ठेवला. अशा पुरुषांची संख्या सुमारे पाच हजारांपर्यंत वाढत गेली. दुसऱ्या दिवशी यहुदी अधिकारी, वडीलजन व शास्त्री यरुशलेम नगरात एकत्र जमले. त्यांनी उच्च याजक हन्ना आणि कयफा, योहान, आलेक्सांद्र व उच्च याजकाचे कुटुंबीय ह्यांची भेट घेतली. ह्या सर्वांनी प्रेषितांना मध्ये उभे करून विचारले, “तुम्ही हे कोणत्या सामर्थ्याने किंवा कोणत्या नावाने केले?” तेव्हा पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला, “अहो, लोकाधिकाऱ्यांनो व वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला म्हणजे तो कशाने बरा झाला, ह्याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल, तर तुम्हां सर्वांना व सर्व इस्राएली लोकांना हे समजायला हवे की, ज्याला तुम्ही क्रुसावर चढवून मारले व ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य पूर्णपणे बरा होऊन तुमच्यापुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी नाकारलेला दगड कोनशिला झाला, तो हाच येशू आहे. तारण फक्त त्याच्याद्वारेच होऊ शकते; पृथ्वीवर मर्त्य मानवांत ज्याच्याद्वारे आपले तारण होऊ शकेल असा दुसरा कोणीही नाही.”

