YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 28:16-31

प्रेषितांचे कार्य 28:16-31 MACLBSI

आम्ही रोम शहरात गेल्यावर रोमन अधिकाऱ्याने बंदिवानांना सेनापतीच्या स्वाधीन केले, पण पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायांबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली. तीन दिवसांनंतर पौलाने यहुदी लोकांची जी मुख्य माणसे होती त्यांना एकत्र बोलावले. ते एकत्र जमल्यावर तो त्यांना म्हणाला, बंधुजनहो, “मी आपल्या लोकांविरुद्ध किंवा पूर्वजांच्या चालीरीतींविरुद्ध काही केले नसता मला यरुशलेममध्ये बंदिवान करून रोमन लोकांच्या हाती देण्यात आले. त्यांनी चौकशी केल्यावर मी मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केला नाही, हे कळल्यावर ते मला सोडू पाहत होते, परंतु यहुदी लोकांनी विरोध केल्यामुळे कैसरजवळ न्याय मागणे मला भाग पडले, तरी मला आपल्या राष्ट्रावर काही दोषारोप ठेवायचा नाही. ह्याकरता तुमची भेट घेऊन तुमच्याबरोबर बोलावे म्हणून तुम्हांला बोलावले. इस्राएली लोकांनी ज्याची आशा बाळगली आहे त्याच्यासाठी मी अशा प्रकारे साखळीने बांधलेला आहे.” त्यांनी त्याला म्हटले, “आपल्यासंबंधाने यहुदियातून आम्हांला काही पत्रे आली नाहीत किंवा बंधुजनांपैकी कोणी येथे येऊन आपणांविषयी काही प्रतिकूल वृत्तांत आणला नाही अथवा काही सांगितलेही नाही. तरी आपले विचार काय आहेत, ते आपणांकडून ऐकून घ्यावे हे आम्हांला योग्य वाटते कारण ह्या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हांला ठाऊक आहे.” म्हणून त्यांनी त्याला एक दिवस नेमून दिल्यावर त्या दिवशी पुष्कळ लोक त्याच्या मुक्कामी आले. त्यांना देवाच्या राज्याविषयी साक्ष देण्याकरता आणि येशूविषयी मोशेच्या नियमशास्त्रावरून व संदेष्ट्यांच्या लेखांवरून त्यांची खातरी करण्याकरता तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत स्पष्टीकरण करत होता. त्याने जे सांगितले त्यावरून कित्येकांची खातरी झाली तर काही लोकांनी विश्वास ठेवला नाही. त्यांचे आपसात एकमत न झाल्यामुळे ते उठून जाऊ लागले, तेव्हा पौलाने त्यांना एक वचन सांगितले: “पवित्र आत्मा यशया संदेष्ट्याद्वारे तुमच्या पूर्वजांबरोबर बोलला ते ठीक बोलला. ते असे की, ह्या लोकांकडे जाऊन सांग की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हांला समजणार नाही व पाहाल तर खरे, परंतु तुम्हांला आकलन होणार नाही. कारण ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे. ते कानांनी मंद ऐकतात आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत, ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, मनाने समजू नये, त्यांचे परिवर्तन होऊ नये आणि मी त्यांना बरे करू नये’. म्हणून तुम्हांला ठाऊक असू द्या की, देवाने सिद्ध केलेल्या तारणाचा संदेश यहुदीतरांकडे पाठवला आहे आणि ते तो ऐकतील.” तो असे बोलल्यावर यहुदी लोक आपसात बराच वादविवाद करत निघून गेले. पौल आपल्या भाड्याच्या घरात पूर्ण दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत, त्या सर्वांचे तो स्वागत करत असे. तो उघडपणे पूर्ण धैर्याने कोणापासून अडथळा न होता देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.

प्रेषितांचे कार्य 28:16-31 साठी चलचित्र