प्रेषितांचे कार्य 2:38-47
प्रेषितांचे कार्य 2:38-47 MACLBSI
पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुमच्या पापांची तुम्हांला क्षमा मिळेल आणि तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण देवाचे वचन तुम्हांला, तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना आपला प्रभू परमेश्वर स्वतःकडे बोलावितो तितक्यांना दिले आहे.” आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना आर्जवून म्हटले, “ह्या भ्रष्ट पिढीला होणाऱ्या शिक्षेपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या!” त्या वेळी त्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला व त्यांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात व सहभागितेत, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात वेळ व्यतीत करीत असत. प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती म्हणून प्रत्येक मनुष्याला आदरयुक्त भय वाटत होते. विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही सामाईक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतशी सर्वांना वाटून देत असत. ते दररोज मंदिरात एकत्र जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि आनंदी व विनम्र वृत्तीने अन्न खात असत. देवाची स्तुती करीत सर्व लोकांच्या सद्भावना त्यांच्या पाठीशी असत. तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची भर प्रभू दररोज त्यांच्यात घालत असे.


