YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 15:22-41

प्रेषितांचे कार्य 15:22-41 MACLBSI

पौल व बर्णबा ह्यांच्याबरोबर आपणांतून निवडलेली माणसे म्हणजे बंधुजनांतील अत्यंत आदरणीय समजल्या जाणाऱ्या बर्शब्बा म्हटलेल्या यहुदा व सीला ह्यांना अंत्युखियास पाठवले तर बरे होईल, असे सर्व ख्रिस्तमंडळीसह प्रेषित आणि वडीलजन ह्यांना वाटले. त्यांच्या हाती त्यांनी असे पत्र लिहून पाठवले: अंत्युखिया, सूरिया व किलिकिया येथील यहुदीतरांतले बंधुजन ह्यांना प्रेषित व वडीलवर्ग ह्या बंधुजनांचा नमस्कार. आमच्यापैकी काहींनी जाऊन त्यांच्या बोलण्याने तुमच्या मनात संदेह निर्माण करून तुम्हांला त्रास दिला, असे आमच्या कानी आले आहे, पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते. म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरता जिवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेली माणसे तुमच्याकडे पाठवावीत. ह्याकरता यहुदा व सीला ह्यांना आम्ही पाठविले आहे. ते स्वतः आम्ही इथे लिहिलेल्या गोष्टी तुम्हांला तोंडी सांगतील; कारण पुढे दिलेल्या जरूरीच्या गोष्टींशिवाय तुमच्यावर जास्त ओझे लादू नये, असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले: त्या गोष्टी म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून मारलेले प्राणी व जारकर्म हे तुम्ही वर्ज्य करावे, ह्यांपासून स्वतःला दूर ठेवाल तर तुमचे हित होईल. तुमचे कल्याण असो. त्यांना पाठवून दिल्यावर ते अंत्युखियास गेले आणि त्यांनी सर्व श्रद्धावंतांना जमवून ते पत्र सादर केले. त्यातला प्रोत्साहनात्मक संदेश वाचून त्यांना आनंद झाला. यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते म्हणून त्यांनी बराच वेळ बोलून बंधुजनांस धैर्य व शक्ती देणारा बोध केला. ते काही दिवस तेथे राहिल्यावर ज्यांनी त्यांना पाठवले होते, त्यांच्याकडे बंधुजनांनी त्यांना शांतीने पाठवून दिले. परंतु सीलाला तेथे आणखी राहावयास बरे वाटले. पौल व बर्णबा इतर पुष्कळ जणांबरोबर प्रभूचे वचन शिकवीत व शुभवर्तमानाची घोषणा करीत अंत्युखियात राहिले. काही दिवसानंतर पौलने बर्णबाला म्हटले, “ज्या ज्या नगरात आपण प्रभूच्या वचनाची घोषणा केली, त्या त्या नगरांत पुन्हा जाऊन बंधुजनांना भेटून ते कसे आहेत, ते पाहू या.” बर्णबाची इच्छा होती की, योहान ऊर्फ मार्कलाही बरोबर घ्यावे. परंतु पौलाला वाटले की, पंफुल्याहून जो आपल्याला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्णबा योहान ऊर्फ मार्कला घेऊन तारवात बसून कुप्र येथे गेला. पौलाने सीलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या हाती सोपविल्यावर तो तेथून निघाला. तो ख्रिस्तमंडळ्यांना स्थिर करीत सूरिया आणि किलिकिया या प्रदेशातून गेला.

प्रेषितांचे कार्य 15:22-41 साठी चलचित्र