YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांचे कार्य 11:19-30

प्रेषितांचे कार्य 11:19-30 MACLBSI

स्तेफनवरून उद्भवलेल्या संकटामुळे ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांच्यापैकी काही जण फेनीके, कुप्र व अंत्युखिया येथपर्यंत फिरून फक्त यहुदी लोकांना देवाचे वचन सांगत होते. परंतु कुप्र व कुरेनेकर येथील कित्येकांनी अंत्युखियात जाऊन प्रभू येशूचे शुभवर्तमान ग्रीक लोकांनाही सांगितले. त्या वेळी प्रभूचे सामर्थ्य त्यांच्याबरोबर होते आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळत होते. त्यांच्याविषयीचे वृत्त यरुशलेममधील ख्रिस्तमंडळीच्या कानी आले, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठवले. तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून तो हर्षित झाला. त्याने त्या सर्वांना बोध केला, “दृढ निश्चयाने प्रभूला बिलगून राहा.” बर्णबा चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता. तेव्हा पुष्कळ जण प्रभूला मिळाले. नतंर तो शौलाचा शोध करावयाला तार्स येथे गेला. त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियाला आणले. त्याने तेथे वर्षभर ख्रिस्तमंडळीमध्ये मिसळून बऱ्याच लोकांना प्रबोधन केले. श्रद्धावंतांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले. त्या दिवसांत यरुशलेमहून अंत्युखियास काही संदेष्टे आले. त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने सुचविले, “सर्व जगात भीषण दुष्काळ पडणार आहे.” (हा दुष्काळ क्लौद्य सम्राटाच्या राजवटीत झाला.) हे ऐकून प्रत्येक शिष्याने निश्चय केला की, यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ति साहाय्य पाठवावे. त्याप्रमाणे त्यांनी केले, म्हणजे त्यांचे दान त्यांनी बर्णबा व शौल ह्यांच्याद्वारे ख्रिस्तमंडळीच्या वडिलांकडे पाठवून दिले.

प्रेषितांचे कार्य 11:19-30 साठी चलचित्र