YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 करिंथ 15:20-41

1 करिंथ 15:20-41 MACLBSI

परंतु वस्तुस्थिती ही आहे की, ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे. जे मरण पावले आहेत त्यांतला तो प्रथम फळ आहे. खरोखर ज्याअर्थी मरण मनुष्याद्वारे आहे त्याअर्थी मेलेल्यांचे पुनरुत्थान मनुष्याद्वारे आहे. जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे:प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे आहेत, ते त्याच्या आगमनकाळी. नंतर शेवट होईल, त्यावेळी प्रत्येक अधिकार व प्रत्येक सामर्थ्यही तो नष्ट करील व राज्य देवपित्याच्या स्वाधीन करील; कारण त्याच्या पायांखाली सर्व शत्रू आणेपर्यंत त्याला राज्य केले पाहिजे. जो शेवटचा शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय. पवित्र शास्त्रात म्हटले आहे, ‘देवाने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.’ परंतु सर्व अंकित केले आहे, असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही, हे उघड आहे. त्याच्या अंकित सर्व काही झाले, असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल, अशा हेतूने की, देव सर्वांना सर्व काही होवो. असे नसल्यास मेलेल्यांच्या वतीने जे बाप्तिस्मा घेतात त्यांचे काय? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत, तर त्यांच्या वतीने लोक बाप्तिस्मा का घेतात? आम्हीही घडोघडी जीव धोक्यात का घातला असता? बंधुजनहो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामधे मला तुमच्याविषयी जो अभिमान वाटतो त्याला स्मरून मी खरोखर सांगतो की, मी रोज मृत्यू स्वीकारतो! जर केवळ मानवी आकांक्षेनुसार इफिस येथे मी श्वापदांना झुंज दिली, तर त्यात मला काय मिळाले? मेलेले उठवले जात नाहीत, तर धर्मशास्त्रानुसार ‘चला, आपण खाऊ, पिऊ, कारण उद्या आपण मरणार.’ फसू नका; कुसंगतीने शील बिघडते, नीतिमत्ता म्हणजे काय, ह्याबद्दल शुद्धीवर या आणि विवेकबुद्धीने वागा. पाप करू नका; कारण कित्येकांना देवाची ओळख नसते. तुम्हांला शरम वाटावी म्हणून मी हे बोलतो. आता कोणी म्हणेल, मेलेले कसे उठवले जातात व ते कोणत्या प्रकारच्या शरीराने येतात? हे निर्बुद्ध मनुष्या, जे तू स्वतः पेरतोस ते मेले नाही तर ते जिवंत केले जात नाही आणि तू पेरतोस ते पुढे आकारित होणारे अंग पेरत नाहीस, तर नुसता दाणा, तो गव्हाचा किंवा दुसऱ्या कशाचा असेल. पण देव त्याला त्याच्या संकल्पाप्रमाणे अंग देतो. प्रत्येक बीजाला देव त्याचे अंग देतो. सर्व देह सारखेच नाहीत, तर माणसाचा देह निराळा, पशूंचा देह निराळा, पक्ष्यांचा देह निराळा व माशांचा देह निराळा. तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहेत, पण स्वर्गीयांचे वैभव एक आणि पार्थिवांचे एक. सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे; कारण ताऱ्याताऱ्यांच्या तेजांत निरनिराळे प्रकार असतात.