मत्त. 15:29-38
मत्त. 15:29-38 IRVMAR
नंतर येशू तेथून निघून गालीलच्या सरोवराजवळ आला व येशू डोंगरावर चढून तेथे बसला. मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांस आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले. मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही, त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील.” शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?” तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.” मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या. आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.

