YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्त. 13:37-50

मत्त. 13:37-50 IRVMAR

त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत; तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्‍यांना जमा करील, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे; त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला. आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्वप्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरलेल्या मनुष्यांनी ते किनार्‍याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.