YouVersion लोगो
सर्च आयकॉन

मत्त. 13:24-46

मत्त. 13:24-46 IRVMAR

येशूने त्यांच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला. “कोणी एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा शत्रू येऊन गव्हामध्ये निदण पेरून निघून गेला; पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निदण ही दिसले. तेव्हा घरधन्याच्या दासांनी येऊन त्यास म्हटले, महाराज, आपण आपल्या शेतामध्ये चांगले बी पेरले ना? तर मग त्यामध्ये निदण कोठून आले? तो त्यांना म्हणाला हे काम कोणा शत्रूचे आहे. दासांनी त्यास म्हटले, तर आम्ही जाऊन ते काढून टाकावे अशी आपली इच्छा आहे काय? तो म्हणाला, नाही. तुम्ही निदण गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू ही उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या; मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की, पहिल्याने निदण गोळा करा आणि जाळण्यासाठी त्याच्या पेढ्या बांधा; परंतु गहू मा‍झ्या कोठारात साठवा.” त्याने त्याच्यापुढे आणखी एक दाखला मांडला की, “स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे; तो कोणाएका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला; तो तर सर्व दाण्यामध्ये लहान आहे; तरी वाढल्यावर भाजीपाल्यापेक्षा मोठा होऊन त्याचे असे झाड होते की, आकाशातील पाखर त्याच्या फांद्यात वस्ती करतात.” त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की, “स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे; ते एका स्त्रीने घेऊन तीन मापे पीठामध्ये लपवून ठेवले, तेणेकरून शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले.” या सर्व गोष्टी येशूने दाखल्यानी लोकसमुदायाला सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्याच्याबरोबर काही बोलला नाही; यासाठी की, संदेष्ट्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, दाखले सांगायला मी आपले तोंड उघडीन; जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलून दाखवीन. नंतर तो लोकसमुदायास निरोप देऊन घरात गेला; तेव्हा त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, शेतातल्या निदणाच्या दाखल्याची आम्हास फोड करून सांगा. त्याने उत्तर दिले की, चांगले बी पेरणारा हा मनुष्याचा पुत्र आहे. शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत; तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्‍यांना जमा करील, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको. स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे; त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि तो विकत घेतला.