YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्ग. 4:1-15

निर्ग. 4:1-15 IRVMAR

मग मोशेने उत्तर दिले, “ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत व माझे म्हणणे ऐकणार नाहीत; ते म्हणतील, परमेश्वराने तुला दर्शन दिलेलेच नाही.” परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?” मोशेने उत्तर दिले, “काठी आहे.” मग देव म्हणाला, “ती जमिनीवर टाक.” तेव्हा मोशेने तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून पळाला. परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात पुढे कर व त्याचे शेपूट धर.” तेव्हा त्याने तसे केले, आपला हात पुढे करून त्यास धरले. तेव्हा त्याच्या हातात तो पुन्हा काठी झाला. “म्हणजे ह्यावरून ते विश्वास धरतील, त्यांचा पूर्वजांचा-अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव परमेश्वर याने तुला दर्शन दिले आहे.” मग परमेश्वर त्यास आणखी म्हणाला, “तू तुझा हात तुझ्या छातीवर ठेव,” तेव्हा मोशेने आपला हात आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा तो कोडाने बर्फासारखा पांढरा झाला; मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात छातीवरून काढला तेव्हा तो शरीराच्या इतर भागांप्रमाणे होऊन तो पुन्हा पूर्वीसारखा झाला. मग परमेश्वर बोलला, “जर ते तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत, व पहिल्या चिन्हामुळे तुझा शब्द ऐकणार नाहीत तर दुसऱ्या चिन्हामुळे ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. ही दोन्ही चिन्हे दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाही, तर मग नदीचे थोडे पाणी घे आणि ते कोरड्या जमिनीवर ओत; म्हणजे तू नदीतून घेतलेल्या पाण्याचे कोरड्या भूमीवर रक्त होईल.” मग मोशे परमेश्वरास म्हणाला, “परंतु हे प्रभू, मी तुला खरे ते सांगतो; मी काही बोलका नाही; मी पूर्वीही नव्हतो आणि आता तुझ्याबरोबर बोलल्यानंतरही नाही. तुला माहित आहे की मी तर मुखाचा व जिव्हेचाही जड आहे.” मग परमेश्वर त्यास म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले? मनुष्यास मुका किंवा बहिरा, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मी परमेश्वरच की नाही? तेव्हा मी सांगतो, तू आता जा. मी तुझ्या मुखाला साहाय्य होईन व तू काय बोलावे हे मी तुला शिकवीन.” परंतु मोशे म्हणाला, हे प्रभू! मी तुला विनंती करतो की, तुझ्या इच्छेस येईल त्याच्या हाती त्यास निरोप पाठव. मग परमेश्वर मोशेवर रागावला. तो त्यास म्हणाला, “लेवी अहरोन हा तुझा भाऊ आहे ना? त्यास चांगले बोलता येते हे मला माहीत आहे. तो तुला भेटायला येत आहे. तुला पाहून त्यास मनात आनंद होईल. तू त्याच्याबरोबर बोलून त्याच्या मुखात शब्द घाल. मी त्याच्या व तुझ्या मुखांना साहाय्य होईल आणि तुम्ही काय करावे हे तुम्हास शिकवीन.