2 शमु. 12
12
नाथान दाविदाला ताडन करतो
1परमेश्वराने नाथानाला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, एका नगरात दोन माणसे होती एक श्रीमंत होता आणि एक गरीब. 2श्रीमंत मनुष्याकडे मेंढरे आणि गुरे भरपूर होती. 3पण गरीबाकडे त्याने विकत घेतलेल्या एका लहान मेंढी खेरीज काही नव्हते. त्याने मेंढीला खाऊपिऊ घातले. या गरीब मनुष्याच्या मुलाबाळांबरोबर ती वाढली त्याच्याच अन्नातला घास ती खाई त्याच्याच कपातले पाणी ती पिई त्याच्याच छातीवर डोके ठेवून झोपे त्या गरीबाला ती मेंढी मुलीसारखीच होती. 4एकदा एक पाहुणा त्या श्रीमंत मनुष्याकडे आला. त्या पाहुण्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत मनुष्याची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्यास काही काढून घ्यायचे नव्हते, म्हणून त्याने त्या गरीब मनुष्याची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या पाहुण्यासाठी अन्न शिजवले. 5दावीदाला त्या श्रीमंत मनुष्याचा फारच राग आला. तो नाथानला म्हणाला, परमेश्वराची शपथ या मनुष्यास प्राणदंड मिळाला पाहिजे 6त्या मेंढीच्या चौपट पैसे त्याने भरले पाहिजेत, कारण त्याचे हे भयंकर कृत्य करताना त्यास दया आली नाही. 7तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, तूच तो मनुष्य आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला, तुला शौलापासून वाचवले. 8त्याचे घरदार आणि स्त्रिया तुझ्या स्वाधीन केल्या. इस्राएल आणि यहूदाचा तुला राजा केले. एवढे पुरेसे नव्हते म्हणून तुला आणखीही देत राहिलो. 9असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस, आणि त्याच्या पत्नीचा स्वतःची पत्नी म्हणून स्विकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास. 10तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या पत्नीचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते. 11परमेश्वर म्हणतो, आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या स्त्रिया तुझ्यापासून मी हिरावून घेऊन. त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायकां बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल. 12बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास, पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलादेखत होईल. 13मग दावीद नाथानला म्हणाला, माझ्याहातून परमेश्वराचा मोठा अपराध घडला आहे. नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, परमेश्वराने हा तुझा अपराध दूर केला आहे. तू मरणार नाहीस. 14पण परमेश्वराच्या शत्रूंना तू त्याचा उपहास करायला मोठे कारण दिलेस, म्हणून हा तुझा पुत्र मरेल. 15यानंतर नाथान घरी परतला. उरीयाची पत्नी बथशेबा आणि दावीद यांना झालेला मुलगा परमेश्वराच्या कोपामुळे खूप आजारी पडला. 16दावीदाने बाळासाठी देवाची प्रार्थना केली. दावीदाने अन्नपाण्याचा त्याग केला. घरात जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. 17घरातील वडीलधाऱ्या मनुष्यांनी येऊन दावीदाला जमिनीवरून उठवायचा खूप प्रयत्न केला. पण काही केल्या दावीद तेथून हलेना. त्यांच्याबरोबर खायला प्यायलाही त्याने नकार दिला. 18सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे, मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल. 19पण आपल्या नोकरांची कुजबूज दावीदाने ऐकली त्यावरून मूल गेल्याचे तो मनोमन उमजला. त्याने नोकरांना विचारले, मूल गेले का? नोकरांनी होय म्हणून उत्तर दिले. 20तेव्हा दावीद जमिनीवरून उठला त्यांने आंघोळ केली, कपडे बदलून तयार झाला. मग आराधना करण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यानंतर घरी जाऊन त्याने खायला मागितले. सेवकांनी त्यास वाढले आणि तो जेवला. 21दावीदाचे सेवक त्यास म्हणाले, तुम्ही असे का वागलात? मूल जिवंत असताना तुम्ही अन्नत्याग केलात, शोक केलात. पण मुलगा वारल्यावर मात्र तुम्ही उठलात आणि खाल्लेत. 22दावीदाने सांगितले, मूल जिवंत होते तेव्हा मी अन्न वर्ज्य केले आणि शोक केला, कारण मला वाटले न जाणो परमेश्वरास माझी दया येईल आणि बाळ जगेल. 23पण आता ते गेलेच. तेव्हा आता मी कशासाठी उपास करू? मुलाचे तर प्राण मी परत आणू शकत नाही. ते गेलेच. एक दिवस मीच त्याच्या भेटीला जाईन पण तो आता परत येणे नाही. 24दावीदाने मग आपली पत्नी बथशेबा हिचे सांत्वन केले. तिच्याशी त्याने शरीरसंबंध केला. बथशेबा पुन्हा गरोदर राहिली. तिला दुसरा मुलगा झाला. दावीदाने त्याचे नाव शलमोन ठेवले. शलमोनावर परमेश्वराची प्रीती होती. 25त्याने नाथान या संदेष्ट्यामार्फत दावीदाला निरोप पाठविला. नाथानने त्याचे नाव यदीद्या, म्हणजेच देवाला प्रिय असे ठेवले. परमेश्वराच्या वतीने नाथानने हे केले.
दावीद राब्बा नगर घेतो
1 इति. 20:1-3
26अम्मोन्यांच्या राब्बावर हल्ला करून यवाबाने हे राजधानीचे नगर काबीज केले. 27यवाबाने निरोप्यामार्फत दावीदाला निरोप पाठवला राब्बाशी लढाई देऊन मी हे जलनगर हस्तगत केले आहे. 28आता इतर लोकांस एकत्र आणून या शहराचा ताबा घ्या मी घेण्यापूर्वी हे करा. मी जर आधी ताबा घेतला तर ते नगर माझ्या नावाने ओळखले जाईल. 29मग दावीद सर्व लोकांस घेऊन राब्बाकडे गेला. राब्बा येथे लढाई करून त्याने त्याचा ताबा घेतला. 30त्यांच्या राजाच्या मस्तकावरचा मुकुट दावीदाने काढला. हा मुकुट सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे एक किक्कार#साधारण 34 किलोग्राम होते. त्यामध्ये मौल्यवान रत्ने जडवलेली होती, तो मुकुट लोकांनी दावीदाच्या मस्तकावर ठेवला. दावीदाने बऱ्याच किंमती वस्तू आपल्याबरोबर आणल्या. 31राब्बा नगरातील लोकांसही त्याने बाहेर नेले त्यांना कुऱ्हाडी, करवती, लोखंडी दाताळी यांनी काम करायला ठेवले. त्यांच्याकडून जबरदस्तीने वीट कामही करून घेतले. सर्व अम्मोनी नगरांमध्ये दावीदाने असेच केले. नंतर दावीद आपल्या सैन्यासह यरूशलेमेला परतला.
सध्या निवडलेले:
2 शमु. 12: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.