1 इति. 23
23
लेवी आणि याजक ह्यांची कामे
1आता दावीद म्हातारा झाला होता आणि त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात होता, तेव्हा त्याने आपला पुत्र शलमोन याला इस्राएलाचा राजा केले. 2त्याने इस्राएलमधील सर्व पुढारी मंडळी, याजक आणि लेवी यांना एकत्र बोलावून घेतले. 3तीस आणि त्याहून अधिक वय असलेल्या लेवींची त्याने गणना केली. त्यांची संख्या एकंदर अडतीस हजार होती.
4त्यांच्यातले, चोवीस हजार लेवी परमेश्वराच्या मंदिराच्या कामावर देखरेख करणारे होते आणि सहा हजार अधिकारी आणि न्यायाधीश होते. 5चार हजार द्वारपाल होते आणि दावीद म्हणाला, मी जी वाद्ये आराधना करायला करवून घेतली त्याच्या साथीने परमेश्वराची स्तुती करणारे चार हजार होते. 6लेवीचे पुत्र गेर्षोन, कहाथ आणि मरारी यांच्या घराण्यानुसार दावीदाने सर्व लेवींची तीन गटांमध्ये विभागणी केली.
7गेर्षोन घराण्यात
लादान आणि शिमी हे दोघे होते.
8लादान याला तीन पुत्र. यहीएल हा थोरला. नंतर जेथाम व योएल.
9शिमीचे पुत्र असे शलोमोथ, हजिएल व हारान. लादानच्या घराण्यांचे हे प्रमुख होते.
10शिमीला चार पुत्र. यहथ, जीजा, यऊश आणि बरीया.
11यहथ हा त्यांपैकी मोठा, दुसरा जीजा, यऊश आणि बरीया यांना मात्र फार संतती नव्हती त्यामुळे त्यांचे दोघांचे मिळून एकच घराणे धरले जाई.
12कहाथाला चार पुत्र होते:
अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जियेल.
13अहरोन आणि मोशे हे अम्रामचे पुत्र अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, लोकांस आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती. 14मोशे हा देवाचा संदेष्टा होता. त्याचे पुत्र लेवीच्या वंशातच गणले जात.
15गेर्षोम आणि अलियेजर हे मोशेचे पुत्र.
16शबुएल हा गेर्षोमचा थोरला पुत्र.
17रहब्या हा अलियेजरचा थोरला पुत्र. हा एकुलता एक होता. रहब्याला मात्र बरीच अपत्य झाली.
18शलोमीथ हा इसहारचा पहिला पुत्र.
19हेब्रोनचे पुत्र याप्रमाणे: यरीया मोठा, अमऱ्या दुसरा, यहजिएल तिसरा, यकमाम चौथा.
20उज्जियेलाचे पुत्र: पहिला मीखा आणि नंतरचा इश्शिया.
21महली आणि मूशी हे मरारीचे पुत्र. एलाजार आणि कीश हे महलीचे पुत्र.
22एलाजाराला कन्या रत्नेच झाली. त्यास पुत्र नव्हता. या कन्यांचे विवाह नात्यातच झाले. त्या लग्न होऊन कीशाच्या घराण्यात गेल्या.
23मूशीचे पुत्र: महली, एदर आणि यरेमोथ.
24हे झाले लेवीचे वंशज आपापल्या घराण्यांप्रमाणे त्यांची मोजणी झाली. ते घराण्यांचे प्रमुख होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या नावाची नोंद झालेली आहे. जे वीस किंवा त्याहून अधिक वयाचे होते त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे त्यांचे काम. 25दावीद म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर याच्यामुळे लोकांस शांती लाभली आहे. परमेश्वर यरूशलेमेला कायमच्या वास्तव्यासाठी आला आहे. 26तेव्हा लेवींना निवासमंडप आणि उपासनेतील सेवेचे इतर पात्रे सतत वाहण्याची गरज पडणारहि नाही.”
27लेवी कुळातील वंशजांची मोजदाद करणे ही दावीदाची इस्राएल लोकांस अखेरची आज्ञा होती. त्यानुसार वीस वर्षे आणि त्यापुढील वयाच्या मनुष्यांची मोजणी झाली. 28अहरोनाच्या वंशजांना परमेश्वराच्या मंदीरातील सेवेत मदत करणे हे लेवीचे काम होते. मंदिराचे आवार आणि बाजूच्या खोल्या यांची देखभाल ही त्यांच्याकडे होती. मंदिरातील सर्व पवित्र गोष्टी शुध्द ठेवणे ही त्यांची जबाबदारी होती. देवाच्या मंदिरातील हे काम ते करत असत. 29मंदिरातील समर्पित भाकर मेजावर ठेवणे, पीठ, अन्नार्पण करण्याच्या वस्तू बेखमीर भाकरी यावर त्यांची देखरेख होती. याखेरीज, तव्यावर भाजलेले, मळलेले सर्वकाही सिध्द करणे, मोजून मापून त्या वस्तूंची तयारी करणे हे ही काम त्यांच्याकडे होते.
30ते रोज सकाळ संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत. 31आणि परमेश्वरास शब्बाथ दिवशी, चंद्रदर्शनाच्या आणि नेमलेल्या सणाच्या दिवशी ठरलेल्या संख्येप्रमाणे नेहमी परमेश्वरापुढे सर्व होमार्पणे अर्पण करण्यास हजर राहत.
32ते दर्शनमंडप, पवित्रस्थानाचे प्रमुख होते. आणि त्यांचे सहकारी अहरोनाचे वंशज यांना ते परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेत मदत करत होते.
सध्या निवडलेले:
1 इति. 23: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.