YouVersion लोगो
सर्च आयकॉन

रूथ 4:1-12

रूथ 4:1-12 MARVBSI

इकडे बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला; तेव्हा तो म्हणाला, “अरे गृहस्था, येथे येऊन बस.” तेव्हा तो जाऊन तेथे बसला. मग गावातील वडील जनांतील दहा पुरुषांना बोलावून त्यांना तो म्हणाला, “तुम्ही इकडे येऊन बसा;” आणि तेही बसले. मग तो त्या जवळच्या आप्ताला म्हणाला, “मबाव देशाहून नामी आली आहे; ती आपला बांधव अलीमलेख ह्याच्या शेताचा वतनभाग विकत आहे; तर मला वाटते की, तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडील जन ह्यांच्यासमक्ष ती जमीन तू खरेदी करावीस. तुला ती सोडवायची असली तर सोडव; ती सोडवायची नसली तर तसे सांग, म्हणजे मला समजेल; कारण ती सोडवणारा तुझ्यावाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही; तुझ्यामागून माझा हक्क आहे.” तो म्हणाला, “मी ती सोडवतो.” बवाज म्हणाला, “ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रूथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल; ह्यासाठी की मयताचे नाव त्या वतनाला कायम राहावे.” तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला, “मी ते वतन सोडवू शकत नाही; कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड होईल; तर माझा सोडवण्याचा हक्क तू घे, कारण मला ते सोडवता येत नाही.” वतन सोडवणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्राएल लोकांत प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतण काढून दुसर्‍यास देत असे; प्रमाण पटवण्याची इस्राएल लोकांत हीच चाल होती. तो जवळचा आप्त बवाजास म्हणाला, “तूच ते वतन विकत घे.” मग त्याने आपले पायतण काढले. बवाज त्या वडील मंडळीला व सर्व लोकांना म्हणाला, “आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलीमलेखाचे आणि खिल्योन व महलोन ह्यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे. ह्याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिला मोल देऊन घेत आहे; ते ह्यासाठी की मयताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे, मृताचे नाव त्याच्या भाऊबंदांतून व त्याच्या गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये; ह्याविषयी तुम्ही आज साक्षी आहात.” तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडील जन म्हणाले, “आम्ही साक्षी आहोत, ही जी स्त्री तुझ्या गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्राएल घराण्याची स्थापना करणार्‍या राहेल व लेआ ह्यांच्यासारखे करो; एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो; बेथेलहेमात तुझी ख्याती होवो; आणि तामारेच्या पोटी यहूदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे ह्या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योगे होवो.”

रूथ 4 वाचा

ऐका रूथ 4