रोमकरांस पत्र 3:1-8
रोमकरांस पत्र 3:1-8 MARVBSI
तर मग यहूदी असण्यात फायदा तो काय? अथवा सुंतेपासून झालेला लाभ तो कोणता? सर्व बाबतींत पुष्कळच आहे. प्रथम हे की, देवाची वचने त्यांना सोपवून दिली होती. कित्येकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाची विश्वासपात्रता व्यर्थ करील काय? कधीच नाही! देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो; शास्त्रातही लिहिलेले आहे की, “तू आपल्या वचनात नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.” पण आपल्या अनीतीमुळे जर देवाचे नीतिमत्त्व स्थापित होते, तर ह्यावरून आपण काय म्हणावे? देव जो क्रोधाने शासन करतो तो अनीतिमान आहे, असे म्हणावे की काय? (मी हे मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.) कधीच नाही! असे झाले तर देव जगाचा न्याय कसा करील? तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मीही शिक्षेस पात्र का ठरावे? आणि बरे घडून यावे म्हणून आपण वाईट करू या, असे आपण का म्हणू नये? — आम्ही असेच म्हणतो असा कित्येक लोक आमच्यावर आळ घेतात — अशा लोकांची दंडाज्ञा यथान्याय आहे.

