तो प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. म्हणजे जे कोणी धीराने सत्कर्मे करत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप, संकट व क्लेश येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जिवावर ती येतील; पण सत्कृत्य करणारा प्रत्येक, प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी, ह्यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील. कारण देवाजवळ पक्षपात नाही. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितके नियमशास्त्राव्यतिरिक्त नाश पावतील आणि नियमशास्त्र असून जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्रानुसार होईल. कारण नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरवण्यात येतील. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावत: करत असतात, तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही, तरी ते स्वत:च आपले नियमशास्त्र आहेत. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंत:करणात लिहिलेला आहे असे दाखवतात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां-विषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल. आता जर तू स्वतःला यहूदी म्हणवत आहेस, आणि नियमशास्त्राचा आधार घेतोस व देवाविषयी अभिमान बाळगतोस, तुला त्याची इच्छा कळते आणि नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे जे सर्वोत्तम ते तू पसंत करतोस; आणि नियमशास्त्रात आपल्याला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप उपलब्ध झाले आहे, म्हणून आपण आंधळ्यांचे वाटाडे, अंधारात असलेल्यांचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचे शिक्षक, बालकांचे गुरू आहोत, अशी तुझी खातरी झाली आहे; तर मग दुसर्याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करतोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तींचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय? नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करतोस काय? “तुमच्यामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे,” असे शास्त्रात लिहिलेले आहे. कारण जर तू नियमशास्त्राप्रमाणे वागत असलास तर सुंतेचा उपयोग आहे खरा; परंतु जर तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुंता झालेली असूनही ती न झाल्यासारखीच आहे. तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय? आणि तुला शास्त्रलेख असूनही व तुझी सुंता होऊनही जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो शारीरिक सुंता न झालेल्यांपैकी असून नियमशास्त्र पाळतो, तो करील. कारण जो बाह्यात्कारी यहूदी तो यहूदी नव्हे आणि देहाची बाह्यात्कारी सुंता ती सुंता नव्हे; परंतु जो अंतरी यहूदी तो यहूदी होय; आणि लेखाप्रमाणे व्हायची ती सुंता नव्हे तर आध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची व्हायची ती सुंता होय; अशाची प्रशंसा माणसाकडून नव्हे, तर देवाकडून होते.
रोमकरांस पत्र 2 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 2:6-29
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ