तर मी विचारतो, त्यांचे पतन व्हावे म्हणून ते अडखळले काय? कधीच नाही! तर त्यांच्या ठायी ‘ईर्ष्या निर्माण होण्यासाठी’ त्यांच्या अपराधाने परराष्ट्रीयांचे तारण झाले आहे. आता त्यांचा अपराध ही जर जगाची संपत्ती आणि त्यांचा र्हास ही जर परराष्ट्रीयांची सधनता आहे, तर त्यांची भरती झाल्यास ती सधनता कितीतरी अधिक होईल! पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो; ह्यात माझा उद्देश हा की, जे माझ्या हाडामांसाचे आहेत त्यांच्यामध्ये कसेही करून ईर्ष्या निर्माण करून त्यांच्यातील कित्येकांना तारावे. कारण त्यांचा अव्हेर हा जर जगाचा समेट ठरतो तर त्यांचा स्वीकार हा त्यांचे मेलेल्यांतून जिवंत होणे ठरणार ना? कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील. आता जर काही फांद्या तोडून टाकण्यात आल्या आणि तू रानटी जैतून असता त्यांच्या जागी कलमरूपे लावला गेलास व जैतुनाच्या पौष्टिक मुळाचा भागीदार झालास, तर त्या फांद्यांहून मी मोठा आहे अशी बढाई मारू नकोस. मारशील तर हे लक्षात ठेव की, तू मुळाला आधार दिलेला नाहीस, तर मुळाने तुला आधार दिलेला आहे. मग तू म्हणशील की, “माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.” बरे, अविश्वासामुळे त्या तोडून टाकण्यात आल्या आणि विश्वासाने तुला स्थिरता आली, तर अहंकार बाळगू नकोस, भीती बाळग; कारण जर देवाने मूळच्या फांद्या राखल्या नाहीत तर तो तुलाही राखणार नाही. देवाची ममता व कडकपणा पाहा; पतन झालेल्यांविषयी कडकपणा आणि तुझ्याविषयी देवाची ममता; पण तू त्याच्या ममतेत राहशील तर; नाहीतर तूही छेदून टाकला जाशील. आणि ते अविश्वासात न राहिले तर तेही कलमरूपे लावण्यात येतील; कारण त्यांचे पुन्हा कलम लावण्यास देव समर्थ आहे. जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेषेकरून लावण्यात येईल? बंधुजनहो, तुम्ही आपणांला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की, परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएल लोक अंशत: कोडगे झालेले आहेत; ह्या रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल; शास्त्रात असे लिहिलेले आहे, “मुक्त करणारा सीयोनेतून येईल; तो याकोबापासून अभक्ती दूर करील;” “जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन, तेव्हा त्यांच्याबरोबर हाच माझा करार होईल.” सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत; परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत. कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही. ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाची अवज्ञा करत होता, परंतु आता तुम्हांला त्यांच्या आज्ञाभंगाने दया प्राप्त झाली आहे, त्याप्रमाणे तुमच्यावरील ममतेने त्यांनाही आता ममता प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी आता आज्ञाभंग केला आहे. त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे. अहाहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे! त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत! “प्रभूचे मन कोणी ओळखले अथवा त्याचा मंत्री कोण होता?” “अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?” कारण सर्वकाही त्याच्याचपासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
रोमकरांस पत्र 11 वाचा
ऐका रोमकरांस पत्र 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: रोमकरांस पत्र 11:11-36
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ