प्रकटी 9:12-21
प्रकटी 9:12-21 MARVBSI
पहिला अनर्थ होऊन गेला आहे; पाहा, ह्यानंतर आणखी दोन अनर्थ होणार आहेत. नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिंगांमधून झालेली एक वाणी मी ऐकली. कर्णा असलेल्या सहाव्या देवदूताला ती म्हणाली, “‘फरात महानदीवर’ बांधून ठेवलेले चार देवदूत मोकळे कर.” तेव्हा माणसांपैकी एक तृतीयांश माणसे जिवे मारण्याकरता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्यांसाठी तयार केलेले हे चार देवदूत मोकळे झाले. आणि घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टान्तात घोडे व त्यांच्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे : त्यांना अग्नी, नीळ व गंधक ह्यांच्या रंगांची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी सिंहांच्या डोक्यांसारखी होती; आणि त्यांच्या तोंडांतून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडांतून निघणार्या अग्नी, धूर व गंधक ह्या तीन पीडांमुळे एक तृतीयांश माणसे जिवे मारली गेली. कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडांत व शेपटांत आहे; त्यांची शेपटे सापांसारखी असून त्यांनाही डोकी आहेत, आणि त्यांनी ते उपद्रव करतात. त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी ‘आपल्या हातच्या कृत्यांविषयी’ पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, ‘भुतांची व ज्यांना पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रुप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तींची’ पूजा करणे त्यांनी सोडले नाही; आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, ‘चेटके, जारकर्म व चोर्या’ ह्यांबद्दलही पश्चात्ताप केला नाही.

