YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 45:1-9

स्तोत्रसंहिता 45:1-9 MARVBSI

माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे; राजाविषयी जे काव्य मी रचले ते मी म्हणून दाखवतो; माझी जीभ कुशल लेखकाची लेखणी आहे. मानवजातीत तू अति सुंदर आहेस; तुझ्या मुखात प्रसाद भरला आहे; ह्यामुळे देवाने तुला सर्वकाळ धन्यवादित केले आहे. हे वीरा, तू आपली तलवार कंबरेला बांध, आपले वैभव व आपला प्रताप धारण कर. सत्य, नम्रता व न्यायपरायणता ह्यांच्याप्रीत्यर्थ प्रतापाने स्वारी करून विजयशाली हो, म्हणजे तुझा उजवा हात तुला भयानक कृत्ये करण्यास शिकवील. तुझे बाण तीक्ष्ण आहेत; लोक तुझ्यापुढे चीत होतात; तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात शिरतात. तुझे राजासन देवाच्या राजासनासारखे युगानुयुगाचे आहे;1 तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे. तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे. तुझ्या सर्व वस्त्रांना बोळ, ऊद व दालचिनी ह्यांचा सुगंध येत आहे; हस्तिदंती राजमंदिरातील तंतुवाद्ये तुला आनंदित करतात. तुझ्या सन्मान्य स्त्रियांमध्ये राजकन्या आहेत; ओफीरच्या सुवर्णाने मंडित होऊन राणी तुझ्या उजवीकडे उभी आहे.