YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 40:1-17

स्तोत्रसंहिता 40:1-17 MARVBSI

मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले; हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. जो पुरुष परमेश्वराला आपला भावविषय करतो, आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वार्‍यास उभा राहत नाही, तो धन्य! हे परमेश्वरा, माझ्या देवा, तू आमच्यासाठी केलेली अद्भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही;1 मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत. यज्ञपशू व अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही; तू माझे कान उघडले2 आहेस; होम व पापाबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. ह्यावरून मी म्हणालो, “पाहा, मी आलो आहे; ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे; तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.” महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले; हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस. मी आपल्या मनात तुझे न्यायीपण लपवून ठेवले नाही; तुझी सत्यता व तू सिद्ध केलेले तारण मी विदित केले; महामंडळापासून तुझे वात्सल्य व तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही. हे परमेश्वरा, तू माझ्याविषयीचा आपला कळवळा आवरून धरू नकोस; तुझे वात्सल्य व तुझे सत्य ही माझे नित्य रक्षण करोत. असंख्य अरिष्टांनी मला घेरले आहे; माझ्या दुष्कर्मांनी मला पछाडले आहे म्हणून मला तोंड वर करता येत नाही; ती माझ्या डोक्याच्या केसांपेक्षा अधिक आहेत; माझ्यात त्राण उरले नाही. हे परमेश्वरा, प्रसन्न होऊन मला मुक्त कर; हे परमेश्वरा, मला साहाय्य करण्यास त्वरा कर. जे माझा जीव घेऊ पाहतात ते पूर्णपणे लज्जित व फजीत होवोत; माझे विघ्नसंतोषी मागे हटून अप्रतिष्ठा पावोत. मला “अहाहा! अहाहा!” असे चिडवणार्‍यांची फजिती होऊन त्यांची तोंडे बंद पडोत. तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी आनंद व उल्लास पावोत; तू सिद्ध केलेले तारण प्रिय मानणारे “परमेश्वराचा महिमा वाढो,” असे सतत म्हणोत. मी तर दीन व दरिद्री आहे; तरी प्रभूला माझी चिंता आहे; माझा साहाय्यकारी व माझा मुक्तिदाता तू आहेस; हे माझ्या देवा, विलंब लावू नकोस.