YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 27:1-8

स्तोत्रसंहिता 27:1-8 MARVBSI

परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू? दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू व द्वेष्टे हे माझे मांस खाऊन टाकण्यास जेव्हा माझ्यावर चढाई करून आले, तेव्हा तेच ठेच लागून पडले. सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचरणार नाही; माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहीन. परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपवून ठेवील; मला तो आपल्या डेर्‍याच्या गुप्त स्थळी ठेवील; तो मला खडकावर उचलून ठेवील. आता सभोवतालच्या माझ्या वैर्‍यांपुढे माझे मस्तक उन्नत होईल; त्याच्या डेर्‍यात मी उत्सवपूर्वक यज्ञ करीन. मी गायनवादन करीन, परमेश्वराचे गुणगान गाईन. मी उच्च स्वराने तुझा धावा करत आहे, हे परमेश्वरा, ऐक; माझ्यावर दया कर, माझी याचना ऐक. “माझे दर्शन घ्या,” असे तू म्हटले, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, “हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे.”